अकोले : पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत भंडारदरा पाणलोट क्षेत्रात साडेतीन हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या घाटघर येथे ३ हजार ५०० मिमी पाऊस पडला तर रतनवाडी येथे या पेक्षाही अधिक म्हणजे ३ हजार ६३२ मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असला तरी दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.
कळसूबाई, रतनगडाच्या डोंगररांगेतील आठ-नऊ गावांच्या शिवारात पावसाळ्यात तीन ते पाच हजार मिमी पाऊस पडतो. भंडारदरा धरणाचे हे पाणलोट क्षेत्र. घाटघरच्या कोकणकड्यावरून मान्सून या पाणलोट क्षेत्रात प्रवेश करतो. साहजिकच या घाटघर परिसरात सर्वाधिक पाऊस पडत असतो. घाटघरचा हा परिसर अडीच तीन महिने ढग आणि धुक्यात हरवलेला असतो. या पावसामुळे जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख घाटघरला प्राप्त झाली आहे.
परंतु या वर्षी आजपर्यंत घाटघरपेक्षा रतनगडाच्या पायथ्याशी वसलेल्या रतनवाडीला जास्त पाऊस पडला आहे. या रतनगडावरच प्रवरा नदी उगम पावते. घाटघर, साम्रद, रतनवाडीला पडणारा पाऊस हाच भंडारदरा धरणाचा प्रमुख आधार. पाणलोट क्षेत्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे येत असताना पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे घाटघरपासून अकोल्यापर्यंत पोहोचताना पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते.
मान्सूनचे उशिरा झालेले आगमन आणि मध्यंतरी काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती वगळता भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. कधी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतात तर बऱ्याच वेळा मुसळधार. त्यामुळेच आजपर्यंत पाणलोट क्षेत्रातील घाटघर, साम्रद, रतनवाडी परिसरात दिवसाला सरासरी ६० मिमी पाऊस पडला आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अन्य ठिकाणी आजपर्यंत पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे-पांजरे २ हजार १८४, भंडारदरा १ हजार ८१९, वाकी १ हजार ५०९. निळवंडे ७७३ मिमी. अकोल्यात ५२८ मिमी. पावसाची दोन महिन्यात नोंद झाली आहे.
धरणातील पाणीसाठे
भंडारदरा पाणलोट क्षेत्राप्रमाणेच मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या हरिश्चंद्रगड परिसरातही भंडारदरा पाणलोट क्षेत्रासारखाच चांगला पाऊस पडला. या पावसामुळे मुळा पाणलोट क्षेत्रातील लहान मोठे तलाव तुडुंब भरून वाहत असून मुळा धरण ९० टक्के भरले आहे. आज, गुरुवारी सकाळचा विविध धरणांचा पाणीसाठा दशलक्ष घनफूटमध्ये असा- भंडारदरा ९ हजार ५६३ (८६.६३ टक्के), विसर्ग ३ हजार ४८० क्युसेक. निळवंडे ७ हजार ३८४ (८८.६६), विसर्ग ६ हजार १६ क्युसेक. मुळा २३ हजार ७६ (८८.७५ टक्के), कोतुळ विसर्ग ३८२२ क्युसेक.