लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले. यामध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. असं असलं तरीही भाजपाच्या सर्व नेत्यांनी ४०० पारचा दिलेला नारा प्रत्यक्षात उतरत नसल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी भाजपाला कानपिचक्या देत राज्यात भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या या विधानावर बोलताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. “भाजपावर बोलण्याआधी खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावं”, असा खोचक सवाल महाजन यांनी खडसेंना केला.

गिरीश महाजन काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ४०० पारची घोषणा केली होती. एक्सिट पोलमध्ये जवळपास ३७५ ते ४०० जागा येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आम्ही तो आकडा निश्चितच पार करू, असा विश्वास आम्हाला आहे. उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर सर्वांना निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल. महाराष्ट्रामध्येही महायुती कुठेही कमी राहणार नाही. महाराष्ट्रात महायुती ३५ जागांचा आकडा पार करेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना ‘ती’ पत्रकार परिषद भोवणार? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी एक्झिट पोल्सच्या महाराष्ट्रातील महायुतीला मिळणाऱ्या आकड्यांबाबत भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “भारतीय जनता पक्ष ज्यांनी रात्रंदिवस काम करून उभा केला, त्यांचा हा पक्ष असताना इतराच्या हातामध्ये जाणं आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे. हे जनतेला वाटलं. त्यामुळे अजित पवार यांना या निवडणुकीत फार प्रतिसाद दिसत नाही. तसेच शिवसेना शिंदे गटालाही जास्त प्रतिसाद दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चिंता करण्याची गरज आहे”, असं खडसे यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ खडसे यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, “त्यांना म्हणा तुम्ही आमची चिंता करु नका. तुम्ही नेमकं कोणत्या पक्षात आहात आधी ते सांगा आणि मग बोला”, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली. दरम्यान, तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी यासंदर्भात एकनाथ खडसे यांनीच याबाबत घोषणा केली. मात्र, त्यानंतर आतापर्यंत एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश झालेला नाही. यावरूनच गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावला आहे.