भारताने ३.५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचा टप्पा पार केल्यानंतर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर आणि भाजपावर टीका केलीय. यावरूनच आता भाजपा आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर हल्लाबोल केलाय.

अतुल भातखळकर म्हणाले, “‘पार्टटाईम’ इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता ‘पार्टटाईम’ अर्थशास्त्री झालेत. ३.५ ट्रिलियनचा टप्पा गाठून आपण इंग्लंडला मागे सारले हे त्यांच्या दृष्टीने यश नाही, पण मग हे ७० वर्षात काँग्रेसला का झेपले नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हे शक्य कसे झाले?”

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “इंग्लंडचा जीडीपी ३.२ ट्रिलियन आहे. भारताचा ३.५ ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो, त्यांना फक्त ६.८ कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. आपल्याला १४० कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो!”

दरम्यान, याआधी आव्हाडांनी आणखी एक ट्वीट करत भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, “भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रथमच भारतावरील इतर देशांचे कर्ज अर्थात विदेशी कर्ज एकूण ६२०.७० अब्ज डॉलर्स पार गेले असून ते परकीय चलन साठ्यापेक्षा अधिक झाले आहे. एकीकडे महागाईने कहर केलेला असताना देशावर मोठ्या प्रमाणावर वाढते कर्ज कशाचे द्योतक आहे?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.