Suresh Dhas On Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्याची मागणी सुरूच असून काही राजकीय नेते सातत्याने यासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत. यामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस यांचाही समावेश असून या घटनेच्या चौकशीचा त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यादरम्यान वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावे अशी मागणी होत आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या पालकमंत्री पदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारलं तरी आपली हरकत नसल्याचे म्हटले आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

पुढे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी होत आहे. यासंबंधी चर्चेवर देखील भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाहीत झाले तर आम्हाला अजित पवार झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर जसे ते (मुख्यमंत्री) सुतासारखा सरळ करतील, अजीत पवार सुद्धा करतील. कारण अजित पवारांच्या हाताखाली मी काम केलं आहे. वेड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. ते स्पष्ट सांगतात की हे भंगार आहे हे करू नका”.

हेही वाचा>> Rural Poverty : गाव आणि शहरातील अंतर घटलं; १२ वर्षांमध्ये ग्रामीण दारिद्र्य २५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर

जागा रिक्त राहिली म्हणून काही फरक पडतो का?

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना धस म्हणाले की, “त्यांच्याच पक्षातील लोक म्हणत आहेत. मी अजून राजीनामा मागितला नाही. पण प्रकाश सोळंके जिल्ह्यातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की यांचा राजीनामा घ्या. कुणाला संधी देऊ नका. एखादं मंत्रीपद रिक्त राहुद्या. एक जागा रिक्त राहिली म्हणून काही फरक पडतो का? ही आमच्यासाठी (भाजपा) ही चांगली गोष्ट आहे. शरद पवार यांच्याकडून वळालेला मतदार हा अजित पवार यांच्याकडे आला होता. अजित पवार यांनी निर्णय घेतला नाही तर त्यांना हे मतदार टिकवता येणार नाहीत. त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार त्यांना चिकटणार आहे, हे वास्तव सत्य आहे”, असेही सुरेश धस यावेळी म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या जलद तपासासाठी काढण्यात येत असलेल्या मोर्चासंदर्भात देखील धस यांनी यावेळी माहिती दिली. आपण उद्या परभणी येथील आणि परवाच्या पुण्यातील मोर्चात जाणार आहोत. तसेच ६ तारखेला संभाजीराजे आम्हाला राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्‍यांची भेट घेण्यासाठी चला म्हणाले तर तिकडे देखील जाणार आहोत. तसेच सर्व पक्षांचे लोक उद्या परभणीला येत आहेत, असेही धस यांनी यावेळी स्पष्ट केले.