“सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यात वाद निर्माण झाला आहे. भाजपाने काही ठिकाणी भुजबळ यांचा निषेधही केला आहे.

छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत,” असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“त्यांना आपण शिक्षणाची देवता मानायचं नाही का?”

“एकनाथ शिंदे हे भाजपाने वापरलेलं एक हत्यार असून, ते आरएसएसच्या ओंजळीने पाणी पितात. भाजपाने एकनाथ शिंदेंच्या तोंडातून ही भाषा वधवली आहे. सर्वांनी आपल्या श्रद्धा आपल्याजवळ जोपासल्या पाहिजेत. ज्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांना घरातून बाहेर काढत स्त्री-शिक्षणाची मुहूर्तवेढ घातली, त्यांना आपण शिक्षणाची देवता मानायचं नाही का? याचं उत्तर भाजपाने दिलं पाहिजे,” असा सवाल बीड येथील राष्ट्रवादी महिलाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी विचारला आहे.

“भाजपाची पिलावळ…”

“भाजपा एकनाथ शिंदेंच्या आडून महाराष्ट्रात, हुकूमशाही आणि मनुस्मृतीचं राज्य आणू पाहत आहे. एकनाथ शिंदेंच्या डोक्यात वाक्य घालून देण्याचं काम भाजपाची पिलावळ करत आहेत,” अशी घणाघाती टीकाही हेमा पिंपळे यांनी भाजपावर केली आहे.

हेही वाचा – छगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. “शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.