राजापुर : राजापूर तालुक्यातील सागवे येथे कुत्र्याची शिकार करणारा बिबट्या एका घरातील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला असून रंगावरून तो ‘ब्लॅक पँथर’ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजापूर तालुक्यामध्ये यापूर्वी दोनवेळा ब्लँक पँथर आढळलेला असून दीड-दोन वर्षापूर्वी सागवे नजीकच्या कुवेशी येथे फासकीमध्ये ब्लँक पँथर अडकल्याची घटना घडली होती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झालेला बिबट्या हा ‘ब्लँक पँथर’ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राजापूर तालुक्यामध्ये यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये राजापूरातील ओणी येथे विहीरीमध्ये पडलेला आणि दीड-दोन वर्षापूर्वी कुवेशी येथे फासकीमध्ये ब्लँक पँथर अडकल्याची घटना घडली होती. या दोन्ही ठिकाणी वनविभागाला ब्लँक पँथरची सुखरूपपणे सुटका करण्यात यश आले आहे. यातून राजापूरमध्ये ब्लँक पँथरचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झालेले आहे. अशातच तालुक्यातील सागवे येथे रात्री बिबट्याकडून कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारा बिबट्या हा काळ्या रंगाचा असल्याचे दिसत असल्याने कुत्र्याची शिकार करणारा बिबट्या हा ब्लँक पँथर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता राजापूरचे वनपाल जयराब बावदाने यांनी सागवे येथे कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला बिबट्या रंगावरून ब्लँक पँथर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची घटनास्थळी जावून वनविभागाकडून खातरजमाही केली जात आहे.