अलिबाग – अलिबाग येथील समुद्रात शनिवारी दोन पर्यटक बुडून बेपत्ता झाले होते. यातील एका पर्यटन पर्यटकाचा मृतदेह आज सायंकाळी सासवणे येथील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला. हा मृतदेह शशांक सिंग या बेपत्ता तरुणाचा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली. या दुर्घटनेतील दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.
उरण आणि नवी मुंबई परिसरातील चार मित्र अलिबागला फिरायला आले होते. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास यातील एकजण पोहायला उतरला. तो बुडू लागल्याने दुसरा त्याला वाचवायला गेला. मात्र दोघेही बुडून बेपत्ता झाले. शशांक सिंग (१९) रा. उलवे ता. उरण आणि पलाश पखर (१९) रा. सानपाडा नवी मुंबई अशी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे होती.
गेले दोन दिवस या तरुणांचा शोध सुरू होता. स्थानिक जीव रक्षक, पोलीस, महसूल विभाग आणि किनारपट्टीवरील गावांमधील स्थानिक प्रशासनाच्या वतीने या तरुणांचा शोध सुरू होता. रोहा येथून महेश सानप यांच्या मदत व पथकाला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र दोघांचाही शोध लागत नव्हता. बेपत्ता पर्यटकांचे नातेवाईक दोघांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण दोन दिवसात काहीच हाती लागले नव्हते. अखेर सोमवारी सायंकाळी अलिबाग तालुक्यातील शासनाने समुद्रकिनाऱ्यावर एक मृतदेह वाहून आल्याची माहिती स्थानिकांनी मांडवा पोलिसांना कळवली. पोलिसांनी तिथे जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. आणि अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. तेंव्हा तो मृतदेह शशांक सिंग याचा असल्याचे स्पष्ट झाले अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. उद्या सकाळी दुसऱ्या बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
