सांगली : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक मागणीचे आरोप पत्रकार बैठकीत केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि संबंधित पीडित तरुणीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयोगाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कडेगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी पीडितेला स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने नेवून लैंगिक अत्याचार केले होते. २०२० मध्ये या घटनेविरुद्ध पीडितेने तक्रारही दाखल केली. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सह्याद्री अतिथीगृहात बोलावून पैशांची मागणी केल्याचा आरोप श्रीमती देसाई व पीडितेने पत्रकार बैठकीत केला होता. याबाबत संबंधितांना राज्य महिला आयोग, पोलिसांकडे अथवा अन्य यंत्रणेकडे तक्रार न देता कोणताही पुरावा सादर न करता आरोप करून आयोगाची व अध्यक्षांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाच्या सचिव पद्यश्री बनाडे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.