सातारा: राज्यातील वाचन संस्कृती चळवळ वाढविण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करीत असून सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाने वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. यापुढेही ही वाचन चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहचावावी, असे आवाहन उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्द्ल श्री. पाटील यांनी येथे येऊन पाठक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. अध्यक्षस्थानी अनंतराव जोशी होते. ग्रंथालय विभागाचा मंत्री म्हणून माझ्याकडेच जबाबदारी आहे, असे सांगून पाटील म्हणाले, राज्यात साडेअकरा हजार ग्रंथालये असून या ग्रंथालयाचे ६० टक्के अनुदान वाढविले. मात्र, ते खूपच तुटपुंजे आहे. नव्याने ४० टक्के वाढ देणार असून मार्चमध्ये अर्थसंकल्पात त्याची तरतूद होणार आहे.

सातारा नगरवाचनालयाने केलेल्या कामाचे कौतुक करून पाटील यांनी या वाचनालयात १ लाख ५५ हजार पुस्तके आहेत आणि वाचनालयाच्या देखण्या इमारतीच्या उभारणीस प्रारंभ करा, त्यासाठी विविध सीएसआरमधून मी मदत करतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. फिरते वाचनालय, पुण्यात होणारे प्रदर्शन या उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली. वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात वाचनालयाची माहिती दिली. वाचनालय १७५ वर्षांत पदार्पण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांतदादा यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार वाचन चळवळ समृद्धीसाठी प्रयत्न करू, अशी हमी अनंतराव जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात दिली. यावेळी मराठी अभिजात भाषा मान्यतेच्या वर्षपूर्तीबद्दल दुर्मीळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उदघाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करणयात आले. संचालक मंडळातील अमित कुलकर्णी, अनंतराव जोशी, विजयराव पंडित, अतुल दोशी, वैदेही कुलकर्णी, प्रकाशराव शिंदे, अतुल शालगर, डॉ. राजेंद्र माने, प्रसाद गरगटे, रवींद्र झुटिंग, प्रदीप कांबळे, जयंत देशपांडे, नारायण जाधव, डॉ. शाम बडवे, विनोद कुलकर्णी, डॉ. संदीप श्रोत्री, विक्रांत भोसले, श्रीकांत कात्रे यांचा यावेळी पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.

वाचन संस्कृतीला ताकद देताना…

आमदारांना मिळणाऱ्या पाच कोटी निधीतील काही अनुदानातून ग्रंथालयांसाठी पुस्तक खरेदी करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. जिल्हा नियोजन मंडळाच्या विकासकामात ग्रंथालय नव्हते. त्या निधीला आता ग्रंथालय जोडले आहे. जुन्या वाचनालयांना १७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यात दीडशे वर्षापूर्वीच्या ग्रंथालयास ५ लाख, शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रंथालयास ३ लाख, पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रंथालयास २ लाख रुपये अशी रक्कम मंजूर आहे.