लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडलेले आहे. देशातील सातव्या टप्प्यांतील मतदान अद्याप बाकी आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीत अजित पवार गटाला विधानसभेला किती जागांचा शब्द देण्यात आला? याबाबत बोलताना थेट आकडाच सांगितला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत. या लोकसभा निवडणुकीत जी खटपट झाली, ती खटपट विधानसभेच्या निवडणुकीत होता कामा नये, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

हेही वाचा : Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, डॉक्टरांच्या अटकेनंतर काँग्रेसचा हसन मुश्रीफांवर आरोप; म्हणाले, “अपघाताच्या रात्री…”

छगन भुजबळ काय म्हणाले?

“एक निवडणूक संपली आणि कोकणासह उत्तर महाराष्ट्रात शिक्षक-पदवीधर निवडणूक सुरू झाल्यामुळे पुन्हा आचारसंहिता आली. त्यामुळे काम पुन्हा बंद झाली. ही आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एका महिन्यात दुसरी आचारसंहिता येईल. त्यामुळे माझी विनंती आहे, शिक्षक आणि पदवीधर या निवडणुकीशी सर्वसामान्य जनतेचा तसा संबंध नसतो. आता ज्या भागात शिक्षक-पदवीधरची निवडणूक आहे. त्या भागातील आमदारांची काम होणार नाहीत. त्यामुळे मोठी अडचण होईल. त्यासाठी यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. भविष्याचा सामना करायचा असेल तर या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“४०० पार, ४०० पारचा आकडा दलित समाजाच्या मनावर एवढा बिंबवला गेला. ४०० पार म्हणजे संविधान बदलणार, असं वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या मनातील ते काढता काढता नाकीनऊ आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सांगत होते की, असं होणार नाही. तरीरी लोकसभा निवडणुकीत काही परिणाम पाहायला मिळाला. आता एक संपलं नाही तोच दुसरं समोर आलं. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती येणार. हे अशा प्रकारे मध्येच कोणीतरी काहीही काढतं आणि त्यावर चर्चा सुरू होते. हे थांबवलं गेलं पाहिजे”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

लोकसभेला जी खटाटोप झाली ती…

“अनेक आमदारांचे कामं राहिले असतील त्याबाबत अजित पवारांना मी सांगू इच्छितो की, त्यांचे कामं मंजूर करून टाका. कारण आता कामं मंजूर केल्यानंतर ते कामं होऊन पुढच्या आचारसंहितेच्या आत त्याचे नारळ फुटले पाहिजे, तरच त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यामध्ये जर उशीर झाला तर फायदा होणार नाही. आता एक निवडणूक झाली. यापुढे महायुतीमध्ये आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. यावेळेला (लोकसभेला) जी खटपट झाली ती खटपट पाहाता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे. हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०, ६० निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal big statement on ajit pawar group will get 80 to 90 seats in the assembly elections in the grand alliance gkt
First published on: 27-05-2024 at 14:45 IST