सांगली : आष्ट्यामध्ये स्थापना करण्यासाठी नेण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पोलीस प्रशासनाने अडविल्याने सांगली व आष्ट्यात मंगळवारी सायंकाळपासून तणाव निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने सांगली-ईश्वरपूर मार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आष्टा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्यावतीने पूर्णाकृती पुतळा लोकवर्गणीतून बसविण्याचे निश्चित झाले आहे. हा पुतळा आज कार्यशाळेतून आष्ट्याकडे नेण्यात येत होता. मात्र, आष्टा नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच पुतळा वाहतुकीची रितसर परवानगी नसल्याच्या कारणावरून सांगली पोलिसांनी बाह्यवळण रस्त्यावर पुतळा वाहतूक रोखली. यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून घोषणाबाजी सुरू केली आहे.

याबाबत पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष वैभव शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकवर्गणीतून बसविण्यात येत असून, केवळ आज कार्यशाळेतून नेण्यात येत असताना प्रशासनाने रोखला आहे. पुतळ्याची प्रतिष्ठापना होईपर्यंत एका संस्थेच्या आवारात संरक्षित हा पुतळा ठेवण्यात येणार असून, प्रशासनाला रितसर पत्रही दिले आहे. तथापि, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने पुतळा वाहतूक रोखली आहे. यामागे नेमके काय राजकारण आहे, हे समजत नाही.

आम्ही पुतळ्याची प्रतिष्ठापना निवडणूक आचारसंहिता संपल्यावरच करणार आहोत. आता प्रशासनाने पुतळा परत कार्यशाळेत नेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, आम्हाला तो मान्य नाही. प्रशासनानेच आता पुतळा आष्टा येथे नेऊन संरक्षित ठिकाणी ठेवावा, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका श्री. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची वाहतूक रोखल्याचे समजताच सांगली व आष्टा येथील अनेक शिवभक्त घटनास्थळी दाखल झाले असून, रस्त्यावर ठाण मांडले आहे. रस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सांगली शहर, आष्टा आणि जिल्हा मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. पुतळा समिती आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्रीत बसविण्याचा प्रकार घडला होता. यावेळी प्रशासनाने परवानगी घेऊन पुतळा बसविण्यास सांगितले होते. यासाठी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती स्थापन करून पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठीच मिरजेतील कारागिराने तयार केलेला पुतळा आज कार्यशाळेतून आष्टा येथे नेण्यात येत होता.