मुंबई, पुणे, कल्याण, सोलापूर महापालिका यंत्रणांची मदत

सांगली : महापूर ओसरल्यानंतर मुंबई, पुणे, कल्याण, सोलापूर महापालिका यंत्रणेच्या माध्यमातून चार दिवसांत शहर स्वच्छ करण्याचे नियोजन हाती घेण्यात येत असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

सांगलीत पूर ओसरत चालल्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी पूरभागातील स्वच्छतेसाठी राज्यातील महापालिका कर्मचारी येणार आहे. महापालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी महापालिकेचे एक हजारहून अधिक कर्मचारी तनात करण्यात आले आहेत. तसेच स्वछतेसाठी अन्य महापालिकांना विनंती करण्यात आली असून आज-उद्या अत्याधुनिक वाहनासह पथके सांगलीत दाखल होत आहेत.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरानंतर ज्या प्रमाणे अन्य महापालिकांचे आरोग्य कर्मचारी आपल्या वाहन आणि साहित्यासह आले होते आणि दोनतीन दिवसांत सांगली शहर स्वच्छ झाले होते. त्याच धर्तीवर ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये महापुराचा फटका बसला असून या भागात तातडीच्या औषध फवारणीसाठी महापालिकेकडून २० जणांची औषध आणि धूर फवारणे पथक मंगळवारपासून सक्रिय करण्यात आली. या पथकाकडून पूरबाधित भागात सकाळ-संध्याकाळ दोन सत्रात औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर कोणत्याही आजाराचा सामना नागरिकांना करावा लागू नये यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, महापुराचे पाणी संथगतीने ओसरत असून मंगळवारी सायंकाळी कृष्णा नदीतील आयर्वनि पुलाजवळ पाणीपातळी ४८ फूट होती. या ठिकाणी धोका पातळी ४५ तर इशारापातळी ४५ फूट आहे. शहरातील कापड पेठ, गणपती पेठ, गरवारे कन्या महाविद्यालय, राजवाडा चौक आदी ठिकाणचे रस्ते खुले झाले असले तरी अद्याप टिळक चौक, मारुती मंदिर, हरिपूर रस्ता आदी परिसरात महापुराचे पाणी आहे. सांगली-कोल्हापूर रस्ता आज दुपारपासून वाहतुकीला खुला झाला असला, तरी अद्याप कर्नाळ रस्त्यावर पुराचे पाणी असल्याने नांद्रे, पलूस मार्गावरील वाहतूक बंद आहे.