राहता:भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात मान्सून लांबल्याने लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्यात आले आहे.
मान्सून लांबल्याने शेती तसेच गावागावातील पाणी योजनांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची मुंबईत भेट घेतली व आवर्तन सोडण्याची मागणी केली. त्यानुसार हे आवर्तन सोडण्यात आले आहे.
मंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी, शेती व पिण्याच्या पाण्याचे आवर्तनाचे एकत्रित नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जलसंपदा विभागाने काल, मंगळवारी रात्री सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडले आहे.
या आवर्तनासाठी २४०० क्युसेकने भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील गावांना त्याचा लाभ मिळणार आहे. खरिपाच्या पिकांनाही आवर्तनामुळे दिलासा मिळेल. काही गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.
शेवटच्या गावापर्यंत आवर्तनाचे पाणी मिळेल, कुठेही पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्याचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी सांगितले.