कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या प्रतिनिधींना नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत मारहाण झाल्याच्या तक्रारीचे निवेदन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी कर्जतचे पोलीस निरीक्षक सुनील शिरसाठ यांना दिले. या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात प्रतिनिधीचे नाव नमूद केलेले नाही. माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे निवेदनात नमूद करण्यात आली आहेत.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नगरपंचायतची काल, सोमवारी सर्वसाधारण सभा होती. या सभेत आमदार पवार यांचे दोन प्रतिनिधी उपस्थित होते. नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचे कार्यकर्ते व संबंधित पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीची घटना घडली. तसेच आमदार रोहित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. आमदार पवार यांचे प्रतिनिधी सभागृहात संयमाने बसलेले असतानाही लज्जास्पद घटना घडली.
नगराध्यक्षांचे पती व नगरसेवकाचा भाऊ हे तिथे उपस्थित होते. त्यांनीच आमदारांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित का, असा प्रश्न केला, याचा आम्ही निषेध करतो, असे निवेदनात म्हटले आहे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे समर्थक दादागिरी करत आहेत. या घटनेचा आम्ही निषेध करतो. सत्तेचा गैरवापर करणे व नागरिकांवर दहशत निर्माण करणे चुकीचे आहे. जनता एक दिवस योग्य पद्धतीने उत्तर देईल, अशी टीका ऋषिकेश धांडे यांनी केली.