नगरसेवक सचिन शिंदे यांची तक्रार; घंटागाडीचा पंचनामा
नगर : महापालिकेच्या वतीने शहरातील कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी घंटागाडीमध्ये दगड, गोटे व सिमेंटच्या गोण्या भरल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी काल, गुरुवारी सायंकाळी शहरातील कल्याण रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ ठेकेदाराची एक घंटागाडी पकडली. त्यांच्या तक्रारीनुसार महापालिकेने या घंटागाडीचा पंचनामा केला.
कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी ठेकेदाराकडून त्यामध्ये दगड—गोटे भरले जात असल्याचा आरोप यापूर्वीही वेळोवेळी झाला आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे वजन करताना ‘गडबड‘ केली जात असल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती. परंतु आता शिवसेनेचे नगरसेवक शिंदे यांनी सिमेंटच्या गोण्या व दगडगोटे घंटागाडीत भरले जाताना निदर्शनास आणून देत याचा पर्दाफाश केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना नगरसेवक शिंदे यांनी सांगितले की, मनपाने शहरातील कचरा उचलण्यासाठी दोन वर्षांंपूर्वी ‘स्वयंभू‘ या संस्थेस ठेका दिला आहे. या ठेकेदाराची कचरा उचलणारी घंटागाडी काल सायंकाळी कल्याण रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या कडेला सिमेंटच्या गोण्या, दगडगोटे भरताना आढळली. कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठीच हा प्रकार केला जात आहे. संकलित झालेल्या कचऱ्याच्या वजनानुसार मनपा ठेकेदाराला बिल अदा करते.
शिंदे यांनी या संदर्भात सहायक आयुक्त सिनारे यांना दूरध्वनी करून ही घटना सांगितली. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी या घटनेचा पंचनामा केल्याचे शिंदे यांनी सांगितले. आज आयुक्तांना अहवाल देणार
यासंदर्भात सहायक आयुक्त सिनारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सिमेंटच्या गोण्या रिकाम्या होत्या की त्यामध्ये दगडगोटे भरलेले होते याची आपल्याला माहिती नाही. या संदर्भातील अहवाल अद्याप मला प्राप्त झालेला नाही. उद्या, शनिवारी यासंदर्भात आयुक्तांना आपण अहवाल सादर करणार आहोत.