भाजपाची पाचवी यादी रविवारी जाहीर झाली आहे. या यादीत १११ जणांची नावं आहेत. विशेष बाब म्हणजे या यादीत महाराष्ट्रातली तीन नावं आणखी आहेत. ४८ जागांपैकी महाराष्ट्रात भाजपाने २३ जागांवर दावा सांगितला आहे. सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्रातली तीन नावं पाचव्या यादीत

भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. तर गडचिरोलीतून अशोक महादेव नेते भाजपाचे उमेदवार आहेत. सोलापूरमध्ये म्हणजेच प्रणिती शिंदेंच्या समोर भाजपाच्या राम सातपुतेंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार होईल असं दिसून येतं आहे.

सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके उडवत जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा लढा आता लोकसभेच्या रिंगणात रंगणार आहे.

प्रणिती शिंदेंचं पत्र काय?

मा. राम सातपुते जी,
‘आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते.’

हे पण वाचा- भाजपाची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातली आणखी तीन नावं जाहीर, प्रणिती शिंदेंसमोर ‘या’ उमेदवाराचं आव्हान

‘लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.’

‘सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते.’

प्रणिती सुशीलकुमार शिंदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या पत्राला राम सातपुते यांच्याकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून प्रणिती शिंदे भाजपात जातील अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र माझ्या रक्तात काँग्रेस आहे असं सांगत प्रणिती शिंदेंनी त्या चर्चा फेटाळल्या. लोकसभेसाठीच्या पाचव्या यादीत राम सातपुते यांना सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आता या निवडणुकीत काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.