नांदेड : मागील दीड महिन्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे मराठवाड्यात वेगवेगळ्या विभागांच्या १६ हजारांहून अधिक मालमत्तांना जबर फटका बसला असून, पुढील काळात वेगवेगळ्या पायाभूत सुविधा सुरळीत करण्यासाठी सुमारे २५०० कोटी रुपये खर्च लागणार आहे. या निधीसह बाधितांना अतिरिक्त मदत करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने नेमलेल्या पथकाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पक्षाकडे सविस्तर अहवाल देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका पथकाची नियुक्ती केली होती. या पथकात माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रा. यशपाल भिंगे, संदीपकुमार देशमुख बारडकर आदींचा समावेश होता. मागील आठवड्यात या पथकाने तीनही जिल्ह्यांचा दौरा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. मराठवाड्यातील पूरग्रस्त आणि बाधित शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता पुन्हा उभे राहण्यासाठी भरीव आर्थिक मदतीची गरज असून, ही रक्कम २० हजार कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज संदीपकुमार देशमुख यांनी शुक्रवारी येथे वर्तविला.
अतिवृष्टी आणि महापुरात मराठवाड्यात ३१ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके नष्ट झाली. ३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या आपत्तीचा फटका बसला आहे. विभागात १०४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, त्यातील २८ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील आहेत. हजारो जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यांची नोंद अजूनही उपलब्ध नसल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. मराठवाड्यात ७ हजार ९४८ कच्च्या, तर ७४९ पक्क्या घरांची पडझड झाली.
पथकाचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर संदीपकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना विभागातील भयावह परिस्थितीची माहिती विस्तृत निवेदनाद्वारे कळविली. अतिवृष्टीमुळे २७०१ किमी रस्त्यांना फटका बसला आहे. १५०४ पुलांची पडझड झाली. तसेच महावितरणच्या ९ हजार ५०० हून अधिक विजेच्या खांबांचे नुकसान झाले. या सर्व पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी २४३२ कोटी रुपये लागणार आहेत, असे देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालाचा संदर्भ देत सांगितले.
अतिवृष्टी आणि महापुरानंतर मागास असलेल्या मराठवाडा विभागावरील संकट गहिरे झाले असल्यामुळे राज्य शासनाने २०१९मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधितांना जशी मदत केली, तशी मदत आता मराठवाड्यातील बाधितांना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. ही बाब लक्षात घेता येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी मागणी देशमुख यांनी केली. आपल्या या निवेदनाची प्रत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाही पाठविली आहे.