सांगली : थंडावलेल्या पक्षकार्याचा आढावा घेत नवी दिशा देण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस बैठकीत जोरदार वादावादी होत पुढे एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. पक्षधोरण ठरवण्यासाठीच्या बैठकीत निमंत्रण देण्यावरूनच हमरीतुमरीचा प्रकार झाला. हा वाद वाढत जात विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोर उमेदवाराचा प्रचार केल्यावरून शहराध्यक्ष संजय मेंढे यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, तर बैठकीचे निमंत्रण का दिले नाही यावरून मेेंढे यांनी पक्ष निरीक्षकांनाच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी तसेच नवी दिशा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने सध्या प्रत्येक जिल्ह्यात अशा बैठकांचे आयोजन केले आहे. या अंतर्गतच मिरजेतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पक्षकार्याचा आढावा, पक्षाला आलेली मरगळ झटकत नवी दिशा देण्याचा कार्यक्रम ठरवला होता. यासाठी पक्षाच्या वतीने राज्य पातळीवरून माजी आमदार रामहरी रूपनवर आणि आदित्य पाटील हे पक्ष निरीक्षकही आलेले होते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर जामदार, अय्याज नायकवडी, अकबर मोमीन या वेळी उपस्थित होते.
मात्र बैठक सुरू होताच बैठकीची कार्यक्रमपत्रिका, विषय दूर राहात वाद, हमरीतुमरीचे प्रसंग सुरू झाले. बैठकीच्या सुरुवातीला शहराध्यक्ष माजी स्थायी सभापती संजय मेंढे यांनी मिरज शहर कार्यकर्त्यांची बैठक असताना आणि मी अध्यक्ष असताना मला याची कल्पनाच देण्यात आली नाही, मला बोलावलेही नाही, असा मुद्दा उपस्थित करत पक्ष निरीक्षकांना विचारणा केली. या वेळी तुम्ही विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघामध्ये बंडखोरांच्या व्यासपीठावर गेला होता, हे पक्षशिस्तीत बसते का असा सवाल करण्यात आला. आणखी काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना का बोलावले नाही अशी विचारणा केली. आम्हाला डावलून पदाधिकारी निवडण्याचा घाट घातला असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून वादावादी सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जात मारामारीचा प्रकारही घडला.
विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द प्रचार करणाऱ्यांना बैठकीस बोलावले नव्हते. तरीही काहींनी येऊन निमंत्रणावरुन विचारणा करण्याचा प्रयत्न केला. पक्षविरोधी कारवाया करण्याचे प्रस्ताव प्रदेश समितीकडे प्रलंबित आहेत. आज झालेल्या बैठकीतील वस्तुस्थिती दर्शक अहवाल पक्ष निरीक्षक प्रदेश समितीला देणार आहेत. पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष.