सांगली : सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसनेच लढवावी आणि लोकसभेसाठी विशाल पाटील हेच उमेदवार असावेत, अशी आग्रही मागणी शनिवारी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंंबईत बैठक झाली. या बैठकीस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, आ. डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते संजय मेंढे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.




या बैठकीबाबत माहिती देताना आ. सावंत यांनी सांगितले, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून २०१४ चा अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेचाच विजय झाला आहे. २०१९ मध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने पराभव पदरी आला असून मतदानामध्ये ताकद दिसली आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसचीच आहे. राहिली पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी या बैठकीत धरला. लोकसभेसाठी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनाच उमेदवारी पक्षाने द्यावी, जिद्दीने ही निवडणूक काँग्रेस जिंकेल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
भाजपाची उद्या बैठक
दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांतील भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक उद्या रविवारी सांगलीत बोलावण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी दिली. या बैठकीस पालकमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह माजी आमदार, विविध सेलचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.