संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची वाढ अशीच अनियंत्रित राहिली आणि राज्याने कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर ३० एप्रिल अखेरीस महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या ११ लाखांपर्यंत पोहोचेल असे केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत सांगितले. तर एप्रिल अखेरीस राज्यात नऊ लाख अॅक्टिव्ह रुग्ण होतील असा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला असून या वाढणाऱ्या या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात खाटा तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था कशी करायची हे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

राज्यात गेले काही दिवस रोजच्या रोज करोना रुग्णांची संख्या वाढत असून आज राज्यात ५९ हजार ९०७ रुग्ण आढळून आले तर ३२२ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्क्यांहून अधिक होते. आज ते प्रमाण ८२.३६ टक्यांवर आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील अनेक शहरात वेगाने करोना रुग्णांची संख्या वाढत असून आजच रुग्णांना खाटा मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगामी काही दिवसात रुग्णालयात खाटा मिळणे कठीण होऊन बसणार असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळणे हे आव्हान बनणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकूण २,२०,४१९ खाटा असून ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या ६२,३०४ खाटा आहेत. त्यापैकी २०४१९ खाटा म्हणजे ३२.७ टक्के खाटा भरलेल्या आहेत तर २०,५१९ अतिदक्षता विभागातील खाटांपैकी १७,३१८ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. ९३४७ व्हेंटिलेटर पैकी ३१७६ रुग्णांसाठी वापरले जात असून येत्या काही दिवसात ऑक्सिजन खाटा तसेच अतिदक्षता विभागात खाटा मिळणे आव्हान ठरणार आहे. करोनाची ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले असले तरी आगामी दोन आठवड्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढेल असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

बुधवारी राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यात एप्रिल अखेरीस ११ लाख रुग्णसंख्या होईल असे केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांबरोबर घेतलेल्या बैठकीच्या वेळी एप्रिल अखेरीस राज्यात नऊ लाख रुग्ण असतील असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले. वाढते करोना रुग्ण लक्षात घेऊन सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती डॉ प्रदीप व्यास यांनी दिली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर होऊ शकतो असेही डॉ व्यास यांनी सांगितले.

राज्यात आजघडीला ११०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून रुग्णांसाठी ७७७ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. आगामी काही दिवसात साधारणपणे ८५० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल असेही व्यास म्हणाले. राज्याने ऑक्सिजन मिळावा यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुंबई महापालिकेप्रमाणे राज्यातील सर्व महापालिकांनी आपल्या क्षेत्रातील खाटांचे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नियोजन करावे असे आदेश दिल्याचे सांगितले. पोलिसांनाही अधिक काटेकोर राहाण्यास सांगण्यात आले असून आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांशी सौहार्दाने वागण्याचे आदेश आपण जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याचे सिताराम कुंटे यांनी सांगितले.

करोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईत ३४,२५९ अॅक्टिव्ह रुग्ण होते ते आता मंगळवारी ७९,३६८ एवढे झाले आहेत. पुण्यात ८२,१७२ रुग्ण होते ते आता ८४,३०९ झाले आहेत तर औरंगाबाद येथे १००५८ रुग्ण होते ते वाढून १७,८१८ झाले आहेत. नाशिकमध्ये मागच्या वर्षी २१,७४६ अॅक्टिव्ह रुग्ण होते ते वाढून आता ५७,३७२ रुग्ण झाले आहेत. नागपूरमध्ये ३८,३८८ वरून ६११२७ एवढी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये तसेच मास्क घालणे व सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सरकार सर्व खबरदारीचे उपाय करत असून रुग्णांना योग्य उपचार मिळतील याची सर्वतोपरी का़ळजी घेतली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. सध्याचा काळ कठीण असला तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, सरकार आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona in maharashtra central government estimation pmw
First published on: 08-04-2021 at 00:07 IST