राज्यात १५ जुलैपासून सुरू झालेल्या १८ ते ५९ वयोगटासाठीच्या मोफत वर्धक मात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे ८५ हजार नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे एकूण लसीकरणामध्ये जुलैपासून घट झाली आहे. परंतु १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण राज्यभरात सुरू झाल्याने पुन्हा लसीकरणाचा प्रतिसाद वाढला आहे. राज्यभरात शुक्रवारी सुमारे दीड लाख जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये सुमारे ५० टक्के लसीकरण हे वर्धक मात्रेचे झाले आहे.

सर्वाधिक लसीकरण मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये –

वर्धक मात्रेचे लसीकऱण खासगी रुग्णालयांमध्येच सशुल्क सुरू होते. त्यामुळे हे लसीकरण खासगी रुग्णालयांपुरतेच मर्यादित राहिल्याने मुंबई, पुणे या शहरांमध्येच मोठ्या प्रमाणात होत होते. १८ ते ५९ वयोगटामध्ये दैनंदिन सरासरी सहा ते सात हजार नागरिक वर्धक मात्रा घेत होते. शुक्रवारपासून सरकारी केंद्रावर मोफत लसीकरण सुरू केल्यामुळे एका दिवसातच ८४ हजार ९४८ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक लसीकरण मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्येही सशुल्क लस घेणे परवडत नसलेल्या नागरिकांना आता मोफत मात्रा उपलब्ध झाल्याने यांची गर्दी आता केंद्रावर वाढत आहे. शुक्रवारी मुंबईत १८ ते ५९ वयोगटातील १२ हजार ७३० तर ठाण्यात १० हजार १४३ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.