गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आधी केलेल्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात आश्वासन दिलं. मात्र, त्या काळात निर्णय न झाल्याने पुन्हा २५ ऑक्टोबरपासून जरांगे पाटलांनी उपोषण केलं. अखेर सरकारला दोन महिन्यांची मुदत देत त्यांनी उपोषण स्थगित केलं खरं. मात्र, आता त्या मुदतीत सरसकट आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे की २ जानेवारीची यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. सरकार ही मुदत २ जानेवारी म्हणत असताना जरांगे पाटील मात्र २४ डिसेंबरवर कायम आहेत. त्याचबरोबर सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण की फक्त कुणबी नोंदी आढळलेल्या मराठ्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाणार? याविषयीही जरांगे पाटील व सरकारमध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यावर नेमका काय निर्णय होणार? याची उत्सुकता आता वाढली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या मुद्द्यावर पुण्यात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यावर आम्ही कार्यवाही करत आहोत. त्याला जो कायदेशीर वेळ देण्याची गरज आहे तो आम्ही दऊ. ओबीसी समाजालाही सांगितलंय की कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“शेवटी राज्यकर्ते म्हणून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्राची सामाजिक रचना विस्कळीत होणार नाही, याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
बिहार विधानसभेत ६५ टक्के आरक्षणाचं विधेयक बिनविरोध मंजूर, OBC-EBC चा ४३ टक्के वाटा
सुषमा अंधारेंनी शेअर केलेल्या व्हिडीओचं काय?
दरम्यान, सुषमा अंधारेंनी पुणे जेल रोडवरचा म्हणून शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत पोलीस व्हॅन बाजूला घेऊन पोलीस काही लोकांशी बोलत असल्याचं दिसत आहे. त्यावर फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. “सुषमा अंधारेंनीच काय, कुणीही व्हिडीओ वगैरे पोस्ट केला असेल तर त्याची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“ललित पाटील प्रकरणी बोलणारी तोंडं तर बंद झालीच आहेत. उरलेलीही लवकर होतील. थोडी आणखी वाट बघा. या सगळ्या गोष्टींची मुळं खोलवर गेली आहेत. वरवरची कारवाई करून फायदा होणार नाही. याचे मूळ सूत्रधार शोधून काढण्याचीही गरज आहे. त्याचे आदेश मी दिले आहेत”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी टीकाकारांना इशारा दिला आहे.