शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मी मंत्री असताना नितेश राणे यांना तपासणी करून जेलमध्ये पाठवल्याचं म्हणत राणेंना टोला लगावला. तसेच आता तशा प्रकारचे ‘डेअरिंग’ कोण करू शकेल का? असा सवाल करत ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला. आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत राणे प्रकरणावर भाष्य केलं.

दिपक केसरकर म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र, मराठी यांची अस्मिता राखली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे वंशज आहेत. त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे अशी तुलनाच होऊ शकत नाही. ठाकरे विरुद्ध भाजप अशीच तुलना होऊ शकते. एवढी कामगिरी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.”

“मी गृहराज्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता निर्माण झाली”

“राडा संस्कृतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटक, उद्योग व्यवसाय अडचणीत आले होते, पण मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री जबाबदारी दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता निर्माण झाली. त्यामुळे पर्यटन व्यवसाय तेजीत आल्यावर दरडोई उत्पन्न वाढले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता असली पाहिजे,” असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

“मी मंत्री असताना नितेश राणेंची तपासणी करून त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठविले होते”

“तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करून आमदार नितेश राणे रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची तब्येत बिघडली का? याची खात्री प्रशासनाने करणे गरजेचे होते. मी मंत्री असताना त्यांची तपासणी करून त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठविले होते. तशा प्रकारचे “डेअरिंग” आता कोण करू शकेलं का?”, असं म्हणत माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी घरचा आहेर दिला.

“आतातरी नितेश राणेंनी चांगले वागावे, नाही तर…”

दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला असता, तर राणेंना जामीन मिळालाच नसता. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली टीका योग्य नाही. मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने राणे यांना धक्का दिला. त्यामुळे त्याला राजकीय रंग नको. आतातरी नितेश राणेंनी चांगले वागावे, नाही तर त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागेल.”

हेही वाचा : प्रकृती बिघडल्याने नितेश राणे रुग्णालयात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अधिकारी, डॉक्टर दबावाखाली असल्याचे उघड होते”

केसरकर यांनी आज (४ फेब्रुवारी) या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. धडधाकट माणसं जेल टाळण्यासाठी रूग्णालयात जात असतील, तर अधिकारी, डॉक्टर दबावाखाली असल्याचे उघड होते असेही केसरकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, नारायण राणे, गुणाजी गावडे, अभिजित मेस्त्री उपस्थित होते.