अकोले: जिल्ह्याचे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोल्याच्या आदिवासी भागात सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील आरोग्यसेवेचे बळकटीकरण व विकासाचे नवून दालन आदिवासी भागात उघडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
चौंडी येथील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक स्थिती व उपलब्ध वैद्यकीय सुविधा लक्षात घेता हे महाविद्यालय आदिवासी अकोले तालुक्यात होणे योग्य ठरेल. त्यामुळे शेजारच्या जुन्नर, इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागालाही त्याचा फायदा होईल.
जिल्हा राज्यात प्रगत समजला जातो, तरीही जिल्ह्याच्या आदिवासी भागात आरोग्य सेवेची हेळसांड आहे. मोठी रुग्णालये, मुख्यतः शिर्डी ते अहिल्यानगर पट्ट्यात आहेत. एका टोकाला असलेल्या आदिवासी भागातील गंभीर रुग्णाला ७०-८० किमीवर नाशिक अथवा लोणीला जावे लागते. त्यासाठी खर्च येतो शिवाय वेळेत उपचार मिळत नाहीत.तालुक्याच्या पाण्यावर समृद्ध झालेली अनेक वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
मात्र आदिवासी तालुक्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नजीकच्या काळात आदिवासी भागात खासगी वैद्यकीय महाविद्यालय येण्याची सुतराम शक्यता नाही. अन्यथा अत्याधुनिक सुविधा आदिवासी भागाला मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागेल. अकोल्यात सरकारी जागा, मुबलक पाणी उपलब्ध आहे. समृद्धी मार्ग, पुणे-नाशिक महामार्ग सीमेलगत आहेत. आदिवासी भागामुळे केंद्र शासनाच्या योजनांमधून आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकेल.
विविध धरणे, वीजप्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी जमीन दिली. त्यातून अंशतः उतराई होण्यासाठी व आदिवासी भागाची आरोग्यविषयक गरज भागवण्यासाठी जिल्ह्याने वैद्यकीय महाविद्यालय अकोल्याला देण्याची मागणी आहे.
जिल्ह्यातील इतर कोणत्याही भागापेक्षा आदिवासी भागात आरोग्य सुविधांची खूपच आवश्यकता आहे. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलेच्या आदिवासी भागात होणे गरजेचे आहे. आवश्यक तेवढी शासकीय जमीन उपलब्धही आहे. – विनय सावंत, सामाजिक कार्यकर्ते, राजुर