scorecardresearch

“तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे.

“तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं!

Maharashtra Council Live: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं आहे. तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, हे सभागृह आहे, तुम्ही ताबडतोब खाली बसा, अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं आहे. शिक्षकांच्या निधीबाबत चर्चा सुरू असताना गुलाबराव पाटील सभागृहात खाली बसून बोलत होते, त्यानंतर ही खडाजंगी पाहायला मिळाली आहे.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला, पण त्यांनी आपली बाजू मांडण्याऐवजी अनिल परब यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी ते मागच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू लागले, यामुळे नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खाली बसण्याची विनंती केली. मात्र, गुलाबराव पाटील आक्रमक होऊन बोलतच राहिले, यामुळे नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे.

हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha: महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; ‘तो’ उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा

“मंत्री महोदय आपण ताबोडतोब खाली बसा, ही बोलण्याची पद्धत नाहीये, तुमच्या विभागाचा विषय काढलेला नाहीये, मी इथे तुम्हाला ताकीद देतेय, केसरकरांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे, मागच्या कॅबिनेटमध्ये कोण काय करत होतं? हा मुद्दा इथे कशाला काढता? तुम्ही ताबोडतोब खाली बसा. सभागृहात वागायची ही पद्धत नाही. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? तुम्ही चौकात आहात का तुम्ही?” असा संताप नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- “काळी दाढी आणि पांढरी दाढी यातला फरक म्हणजे…”, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून छगन भुजबळांची विधानसभेत टोलेबाजी!

यावेळी गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देताना “मी मंत्री आहे!” असं सांगितलं. यावर नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना चांगलंच सुनावलं आहे. “तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाहीये, तुम्ही ताबडतोब खाली बसा, छातीवर हात बडवून काय बोलता? तुम्ही ताबडतोब खाली बसा…” अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.