पुणे : जागतिक तापमानवाढीमुळे दर वर्षीच ऊन जरा जास्त असते, तसे यंदाही. पण, तेच केवळ पाणी आटवणारे नसून, ‘प्रगत’ महाराष्ट्राला पावसाचे पाणी अजूनही नीट साठवता येत नसल्याने जनतेच्या घशाला कोरड आहे. गेल्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तरी बहुतांश भागांत, अगदी छोट्या-मोठ्या शहरांतही रोज पाणी देणे अशक्य आहे.

परिणामी टँकरवर भिस्त. शिवाय, विंधन विहिरींतून वारेमाप उपसा आणि पाणी वापराच्या बेशिस्त सवयींपोटी त्याचा प्रचंड अपव्यय. अशात पाणी पुरविण्यासाठीच्या योजनांत पाण्यापेक्षा अर्थकारण अधिक मुरते, या वास्तवाने भर घातल्याने यंदाच्या उन्हाळ्याची सावलीही कोरडीच असल्याचे चित्र आहे. ‘लोकसत्ता’च्या राज्यातील विविध भागांतील बातमीदारांनी त्या-त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाण्याची सद्या:स्थिती जाणून घेतल्यावर पाणी नियोजनाच्या अभावाची झळ अधिक प्रकर्षाने दिसली.

मनमाडसारख्या ठिकाणी गेली काही वर्षे १३ दिवसांआड पाणी येते, तर पिंपरी-चिंचवडसारख्या प्रगत उद्याोगनगरीलाही सहा वर्षे एक दिवसाआड पाण्यावरच काढावे लागत आहेत. उन्हाळ्याचा अजून जवळपास दीड महिना शिल्लक असून, सामान्यांना टंचाईची झळ बसू द्यायची नसेल, तर शिल्लक पाण्याचे उत्तम नियोजन आणि समान वाटप हेच आता प्रशासनापुढचे आव्हान आहे.

उत्तर’ महाराष्ट्राला पाणी‘प्रश्न’

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांत ६४ गावे आणि १३८ वाड्यांना ६६ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्हे अजून तरी टँकरमुक्त आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यात ३१ गावे आणि ४१ वाड्यांसह ७२ ठिकाणी २९ टँकर सुरू आहेत. मनमाड येथे १३ दिवसांआड दोन तास, येवल्यात पाच दिवसांआड एक तास तर, मालेगाव येथे दोन दिवसांआड एक तास नळ पाणीपुरवठा केला जातो आहे. जळगाव शहरात तीन दिवसांआड, भुसावळमध्ये १५, असोद्यात १५ ते २० आणि नशिराबादला पाच ते सहा दिवसांआड नळ पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ १५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, धुळे जिल्ह्यात २९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मराठवाडा टँकरवाडा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या १९२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बहुतांश शहरांत रोज पाणी येतच नाही. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद नगरपालिकेमध्ये १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. भोकरदनमध्ये पाच-सहा दिवसांतून एकदा पाणी येते. अंबडमध्ये हा कालावधी नऊ दिवसांतून एकदा असा आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री या नगरपरिषदांत चार दिवसांतून एकदा पाणी दिले जाते. लातुरात अनेक ठिकाणी अगदी स्वयंपाकघरातील लहान पातेलेही पाण्याने भरून ठेवली जात आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक शहरात आता पाणी शुद्धीकरणाचे ‘आरओ – केंद्र’ अनेक व्यावसायिकांनी सुरू केले आहे. ४० लिटरच्या पाण्यासाठी ३० रुपये आकारले जातात.

पश्चिम महाराष्ट्रात शहरे कोरडी

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरकरांना महापालिका प्रशासनाकडून पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही योजना सुरू झाल्यास १३ लाख लोकसंख्येच्या सोलापूरची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून दर तीन महिन्यांतून एकदा चार ते पाच टीएमसी एवढे प्रचंड पाणी सोडावे लागणार नाही. माळशिरस व मंगळवेढा तालुक्यातील सहा गावे आणि ६१ वाड्या-वस्त्यांना सहा टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. सातारा जिल्ह्यात ४९ गावे व ३०८ वाड्या तहानलेल्या आहेत. तेथील ९२ हजार ८७२ नागरिक आणि ६२ हजार ७४७ जनावरांना ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यात पाणीटंचाई आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात फेब्रुवारीअखेरपासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणीयोजना रखडल्याने टंचाईग्रस्त गावांत आणखी ११३ गावांची भर पडणार आहे. जिल्ह्यात सध्या ८३ गावे, ४२४ वाड्या-वस्त्यांवरील १ लाख ६४ हजार ३९४ लोकसंख्येला ९६ टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. तीन मोठे प्रकल्प व सहा मध्यम प्रकल्पांतून एकूण सुमारे ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात ४५.७० टक्के जलसाठा आहे. मात्र, नियोजनाअभावी शहराच्या उपनगरांत चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे, तर १५ टँकर सुरू आहेत. शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

कोकणातही पाणी कमी

अलिबाग : रायगडमधील १२८, तर रत्नागिरीतील ३५७ गावांतील ७२२ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ कोकणवासीयांवर आली आहे. मुंबईच्या वेशीवर असलेल्या रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे-वाड्यांमध्ये ५४ ने वाढ झाली आहे. पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यांतील खारेपाट विभागात, तसेच साडेतीन हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस पडणाऱ्या रत्नागिरीतही पाणीस्थिती बिकट आहे. जिल्ह्यातील ३५७ गावांतील ७२२ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी, खेड, संगमेश्वर, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि लांजा या सात तालुक्यांतील पाणीप्रश्न गंभीर आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

पाणीदार पुण्यातही टँकर

पुणे : पुण्याला पाणी पुरविणाऱ्या चार धरणांत ९.४८ टीएमसी म्हणजे सुमारे ३२ टक्के पाणीसाठा आहे. तो गेल्या वर्षीपेक्षा जास्त असूनही शहरात महापलिकेच्या तीन हजार १५४, तर खासगी ३९ हजार ६२२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. या शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आंबेगावमधील १८, जुन्नरमधील १३, खेडमधील आठ, हवेलीतील दोन, आणि पुरंदर तालुक्यातील १० गावांमधील ९४ हजार ३८८ नागरिकांची तहान टँकरने भागविली जात आहे.

विदर्भात पाण्याचे दुर्भिक्ष

नागपूर : विदर्भातील ग्रामीण भागांत सध्या ५० गावांमध्ये ६३ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अमरावती विभागातील पाणीसाठा ४५ टक्के, तर नागपूर विभागातील जलसाठा ३७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक २६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातही समस्या

ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या भागात दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असते. मात्र गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरनंतरच या दोन्ही तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सद्या:स्थितीत शहापूर तालुक्यातील २९ गावे आणि ११३ पाड्यांना ३७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मुरबाडमधील ३ गावांमध्ये ३ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.