लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर आणि माढ्यासाठी भाजपकढून लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरताना पक्षाला ताकद देण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जुन्या प्रस्थापित नेत्यांकडून दुष्काळी भागात पाणी पोहोचविता आले नाही म्हणून केलेल्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस यांना टोला लगावला. रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार फडणवीस यांच्यावर झाल्याचे दिसतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

माढ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन राजकीय खलबते केली. यावेळी झालेल्या स्नेहभोजनातून शिंदे आणि मोहिते यांच्यात स्नेह जुळल्याचे संकेत मिळाले.

आणखी वाचा-सांगलीच्या रक्तातच बंड, आता माघार नाही – विशाल पाटील

याचवेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीस यांनी सोलापुरात दुष्काळी भागाला ४०-५० वर्षे पाणी मिळाले नाही. त्याबद्दल ४० वर्षे सत्ता भोगणा-या प्रस्थापित नेत्यांना दोष दिला. यातून फडणवीस यांनी सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर थेट नामोल्लेख टाळून टीका केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सोलापूर जिल्हा पारंपारिक दुष्काळी आहे. ४५ वर्षांपूर्वी एकमेव उजनी धरण उभारले गेले. त्याचे पाणी सोलापूर जिल्ह्यास पुरत नाही. तरीही त्यातून सोलापूरचे चित्र बदलत असून ऊस, फळबागा आदी नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर ब-यापैकी मात झाली आहे. सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही, ज्याठिकाणी एकापेक्षा लहानमोठी धरणे आहेत. त्याची फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्याचा त्यांना विसर पडला असावा, असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. फडणवीस यांच्यावर रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसतात, अशीही खरमरीत टीका त्यांनी केली.