देगलूर बिलोली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. देगलूरकरांच्या अपेक्षा भाजपाने मांडल्या नाहीत. त्यांना न्याय देण्याचे काम फक्त महाविकास आघाडी सरकारने केले. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे गेलो आहोत. तर भाजपाने खोटा प्रचार केला, गैरसमज पसरवले. जी फसवणूकीची परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये चालवली. तीच परंपरा त्यांनी देगलूरत येऊन देखील चालवली, असे सावंत म्हणाले.

“भाजपाचे खासदार, आमदार ते देखील फडणवीस यांच्यासारखेच आहेत. त्यामुळे त्यांनीही खोटारडेपणा करण्याची कमी सोडली नाही. देगलूरत केंद्रीय मंत्री आले, देवेंद्र फडणवीस आले. त्यांच्याकडे मोदी सरकार आहे. तरी देखील त्यांनी जनतेला कोणतच आश्वासन दिलं नाही. त्यांनी काही दिलं असेल तर ते म्हणजे गावजेवण दिलं. आम्ही विकासाचा दृष्टीकोन घेऊन चाललो असताना. ही निवडणूक केवळ देवेंद्र फडणवीस यांच मुंगेरीलालच जे स्वप्न आहे. मी पुन्हा येईल,पुन्हा येईल, पुन्हा येईल, या स्वप्नाला उजाळा देण्याची त्यांची आकांक्षा होती.” अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत म्हणाले, “महाविकास आघाडी विविध समाजातील लोकांना सोबत घेऊन आम्ही चालत आहोत. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्तेची लालसा भाजपाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होती. यामध्ये दबाव धमक्यांचा देखील वापर करण्यात आला. भाजपा जाती जातीमध्ये फुट पाडत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीस कायम असत्य बोलतात. त्यांनी भाषणात राज्य सरकारने पिकविम्याचा हप्ता भरला नाही, असा आरोप केला होता. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसचा जीआर होता. ५ ऑक्टोबरला पैसे गेले होते. मात्र केंद्र सरकारनेच हप्ता दिला नव्हता, ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे अशा जबाबदार नेत्याला खोटं बोलन शोभत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कधीतरी सत्य बोलाव” असे सावंत म्हणाले.