रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. दरम्यान, पालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर कथित लाठीमार केल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथे झटापट आणि बाचाबाची झाली आहे. त्याबाबतची खरी वस्तुस्थिती अशी आहे की, मागील वर्षी तिथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये काही महिला जखमी झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अलीकडेच प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक पार पडली. यामध्ये चेंगराचेंगरी घडू नये म्हणून प्रत्येक मानाच्या दिंड्यांना ७५ पासेस उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून चेंगराचेंगरी घडणार नाही, असा निर्णय घेण्यात आला,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- VIDEO: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान आळंदीत पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस पुढे म्हणाले, “संबंधित सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार मानाच्या दिंड्यांतील वारकरी आतमध्ये गेले होते. पण आम्हालाही आत सोडलं पाहिजे, असा आग्रह काही स्थानिक तरुण आणि वारकऱ्यांनी केला. यावेळी ४०० ते ५०० वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही पोलिसांना दुखापत झाली आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही. पोलिसांनी वारकऱ्यांना केवळ रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व परिस्थिती शांत झाली. मुळात चेंगराचेंगरी घडू नये, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला.”