गेल्या २ ते ३ दिवसांपासून राज्यात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलं आहे. एकीकडे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा जबर फटका बसला असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये आलेल्या महापुराचा अनुभव गाठीशी असताना आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तशीच स्थिती निर्माण होतेय की काय, असं चित्र दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

कर्नाटक सरकारची पाठपुरावा गरजेचा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्य सरकारला काही सल्ले दिले आहत. “कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे”, असं फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

“कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर अलमट्टी धरणातून कर्नाटकमध्ये विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आत्ताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

रोख आर्थिक मदत द्या

दरम्यान, कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये दरड कोसळण्याच्या किंवा पूरस्थिती निर्माण होण्याच्या काही घटना घडल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर बाधितांना रोख स्वरूपात मदत करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “कोकण, प. महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारच्या वतीने लगेच दिली जावी.
पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत”, असं फडणवीसांनी नमूद केलं आहे.

 

Photos : पावसाचं पाणी तर थांबलं, पण डोळ्यातल्या पाण्याचं काय? पाहा तळीये गावाची ही विदारक दृश्यं!

“कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे”, असं ट्वीटमध्ये फडणवीसांनी म्हटलं आहे.

 

“तुम्ही स्वतःला सावरा; बाकीची काळजी आम्ही घेऊ”; मुख्यमंत्र्यांनी तळीयेवासियांना दिला धीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हवी

“इतर धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे. कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे”, अशी मागणी देखील फडणवीसांनी केली आहे.