संयुक्त शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (२६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटीलदेखील उपस्थित होते.

दिलीप मोहिते पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष चालू होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर दोन्ही नेत्यांमधला वाद आता मिटला आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला दिलीप मोहिते पाटीलदेखील उपस्थित होते. शिवाजीराव आढळरावांच्या प्रचारालाही मोहिते-पाटील उपस्थित असतील. “आमच्या मतदारसंघातून आढळरावांना पूर्ण पाठिंबा मिळेल” असंही मोहिते पाटलांनी यावेळी सांगितलं. तसेच त्यांनी आढळरावांना आमच्यावर अविश्वास दाखवू नका, असंही सांगितलं.

दिलीप मोहिते पाटील म्हणाले, शिवाजीराव आढळराव पाटलांना मी एवढीच विनंती करणार आहे की जसे अजित पवार माझ्या मागे उभे राहिले, तसेच तुम्हीदेखील राहा. नाहीतर पुन्हा एकदा माझ्या तालुक्यात शिवाजीराव आढळराव पाटलांचा एक गट तयार होईल. मग आमचं कल्याण झालं म्हणून समजा… त्यामुळे मी शिवाजीराव आढळराव पाटलांना एवढंच सांगतो की मागे (लोकसभा निवडणूक २०१९) अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं की, अमोल कोल्हे यांना खासदार करायचं आहे, तेव्हा आम्ही दिवसाची रात्र केली, सर्वांनी मेहनत घेतली, त्यांना खासदार केलं. आता तुम्ही आमच्यावर थोडा विश्वास ठेवा. आम्ही तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. पण एवढंच सांगतो की, तुम्ही अविश्वास दाखवलात तर माझं नाव दिलीप मोहिते पाटील आहे.

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान संजय राऊत, अंबादास दानवे झोपले? भाजपा पदाधिकाऱ्याने शेअर केला VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजीराव पाटील काय म्हणाले?

दरम्यान, यावेळी दिलीप मोहेते पाटील यांच्या भाषणानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनीदेखील भाषण केलं. तेव्हा शिवाजीराव म्हणाले, राजकारण करत असताना दोन नेते आमने-सामने असतातत तेव्हा भांड्याला भांडं लागतंच. परंतु, राजकारणातली समीकरणं बदलल्यानंतर सगळं काही विसरून आपण एकदिलाने नवीन समीकरणाशी जुळवून घेतो आणि काम करतो. तसे आमचे दिलीप मोहिते-पाटील स्वभावाने खूप चांगले आहेत. आमचे वैयक्तिक हेवेदावे कधीच नव्हते. जे काही झालं ते केवळ लोकांची काम करत असताना झालं.