हर्षद कशाळकर, लोकसत्ता
अलिबाग- अलिबाग येथील जिल्हा क्रिडा संकुलाची दूरावस्था झाली असतांना राज्य सरकारने आता माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा घातला आहे. मुळात अस्तित्वात असलेल्या क्रीडा संकुलांची देखभाल दुरूस्ती होत नसतांना करोडो रुपये खर्ची घालून नव्या विभागीय संकुलाची गरज काय असा प्रश्न या निमित्ताने क्रिडा प्रेमींकडून विचारण्यात येत आहे.
जवळपास तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर रायगड जिल्ह्याला २०१५ मध्ये क्रिडा संकुल उपलब्ध झाले होते. यानंतर हे क्रिडा संकुल खेळाडूंच्या साठी उपलब्ध होईल, खेळाडूंचा वनवास संपेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. नंतरच्या काळात संकुलाचा कधी मतमोजणी केंद्र म्हणून, तर कधी मतपेट्या साठवणूकीचे केंद्र म्हणून वापर झाला. नंतर कोव्हीड काळात कोव्हीड केंद्र म्हणूनही क्रिडा संकुलाचा वापर केला गेला. कधी जेल मधील करोना बाधित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी या संकुलाचा वापर केला गेला. तर कधी कोव्हीड सेंटर म्हणून उपचाराधीन रुग्णांच्या सुश्रुषेसाठी संकुलाचा वापर झाला. त्यामुळे खेळाची मैदाने नादुरुस्त होत गेली. देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याने संकुलाची उपेक्षा होत राहीली. आज क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, देखभाल दुरूस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या क्रिडा संकुलाचा फारसा होताना दिसत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलाची कामे अजूनही मार्गी लागलेली नाहीत. अनेक ठिकाणी तालुका क्रिडा संकुलांसाठी जागाच उपलब्ध झालेली नाही.
आणखी वाचा-Weather Update: हवामान विभागाकडून आज, उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट
अशी परिस्थिती असतांनाच आता माणगाव येथे कोकण विभागीय क्रिडा संकुल उभारण्याचा घाट राज्यसरकारने घातला आहे. या विभागीय क्रिडा संकुलासाठी आदिती तटकरे आग्रही आहेत. यासाठी माणगाव येथील ३० ते ४० एकर जागा संपादीत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबईत या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीला महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह क्रिडा मंत्री, संजय बनसोडे उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे हे देखील या बैठकीला आवर्जून हजेरी लावली. यानंतर आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात विभागीय क्रीडा संकूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतील खेळाडूंसाठी या विभागीय क्रीडा संकूलाची उभारणी केली जाणार आहे. माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हा क्रीडा संकुलासाठी माणगावची निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविकपणे जिल्ह्यासाठी अलिबाग तालुक्यातील नेऊली येथे क्रीडा संकुल अस्तित्वात आहे. ज्याची देखभाल दूरूस्ती केली तर क्रीडा संकुलाचा वापर विभागीय स्पर्धांसाठी केला जाऊ शकतो. खेळाडूंची चांगली व्यवस्था होऊ शकते. असे असूनही नव्या विभागीय क्रीडा संकुलाची गरज कशाला असा प्रश्न क्रीडा रसीकांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-पंकजा मुंडे यांची चहूबाजूने कोंडी, कारखान्यावर कारवाई; पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलल्याने खदखद
विभागीय क्रिडा संकूलच कशाला, गावागावात क्रीडा संकुल करा, क्रिडा संघटक म्हणून आमचा पाठींबाच राहील पण जिल्ह्यात यापुर्वी जी क्रीडासंकुले बांधली आहेत. त्यांची किमान देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. नविन संकूले उभी करण्यापुर्वी जुनी क्रीडा संकुले सुस्थितीत आली पाहीजेत. त्यांचा खेळांसाठी वापर झाला पाहीजे, तसेच या क्रीडा संकुलांच्या देखभालींसाठी एखादी अशासकीय समिती कार्यान्वित असली पाहीजे, जी समिती अशी क्रीडा संकुले चांगली चालावित यासाठी प्रयत्न करेल. -गिरीष तुळपुळे, अध्यक्ष, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन
अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. चांगली स्वच्छता गृहे देखील उपलब्ध नाहीत. एखादी स्पर्धा आयोजित करायची झाली तर परिसर स्वच्छता करण्यापासून सर्व कामे आयोजकांना करावी लागतात. त्यामुळे नवे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यापेक्षा आहे त्या क्रीडा संकुलांची दुरुस्ती करणे जास्त संयुक्तीत राहील. -राहूल तावडे, क्रीडा संघटक
महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात आदिती तटकरे क्रीडा विभागाच्या राज्यमंत्री होत्या, तेव्हा पासूनच त्यांचे या विभागीय क्रीडा संकुलासाठी प्रयत्न सुरु होते. माणगाव येथील मुंबई गोवा महामार्ग बाह्य वळण रस्त्यालगतची जागा यासाठी निश्चित करण्यात आली होती. मंत्रिमंडळाची मंजूरीही झाली होती. १२ कोटींचा निधीही मंजूर करून घेतला होता. पण नंतर महाविकास आघाडी सरकार गेले. त्यामुळे या कामाला ब्रेक लागला होता. आता सत्तेत आल्यावर आदिती तटकरे यांनी या प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय सूत्र हलविण्यास सुरुवात केली आहे.