अलिबाग : रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम जोमात सुरू झाला आहे, दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अलिबाग मुरुडसह जिल्हयातील बहुतांश पर्यटन स्थळे हाऊसफुल झाले आहेत. पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिकदेखील खुश झाले आहेत.पावसाळ्यातील चार महिने कोकणात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे मुंबईतून होणारी जल प्रवासी वाहतुक बंद असते. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट असते. तुरळक पर्यटक येत असतात. पण पावसाळा संपला की कोकण किनारपट्टीवरील पर्यटन हंगाम पुन्हा जोमाने सुरू होतो. दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्या पर्यंत तर एप्रिल पासून जून महिन्यापर्यंत पर्यटकांची मोठी रेलचेल या ठिकाणी पहायला मिळते. सध्या याची प्रचिती रायगड मधील अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांवर येत आहे आहे.
सलग सुट्ट्यामुळे अलिबाग मधील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी. नागाव, चौल आणि रेवदंडा येथे साधारणपणे २५ हजार पर्यटक दाखल झाले होते. तर मुरुड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरुड १५ हजारहून अधिक पर्यटक दाखल झाले होते. याखेरीज श्रीवर्धनमधील दिवेआगर, हरिहरेश्वर याठिकाणीदेखील गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे समुद्र किनारे फुलून गेले आहेत. स्थानिक व्यवसायिकांना यामुळे रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. बोटींग व्यवसायिक, वेगवेगळे साहसी जलक्रीडा प्रकार, स्टॉलधारक, नारळ विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत असल्याचे पहायला मिळत होते. पर्यटकांनी समुद्र स्नानाबरोबरच सागरी सफरीचा आनंद लुटला, एटीव्हीराईडस , बनाना राईडस अशा विविध प्रकारांचा आनंद लुटला. घोडसफारी आणि उंट सफारी केली. पर्यटकांचा ओघ वाढल्याने जिल्ह्यातील हॉटेल्स आणि लॉजेस पर्यटकांनी गजबजून गेले होते. त्यामुळे पर्यटनावर आधारित उद्योगांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक कोंडीचा फटका
पर्यटकांच्या आगमनामुळे रायगड जिल्हृयातील रसत्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मुंबई किंवा पुण्याकडून कोकणात येणारया पर्यटकांना सध्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वरकडे जाणारे पर्यटक अडकून पडत आहेत. तर अलिबाग, मुरूडकडे येणारया पर्यटकांचा वडखळ ते कार्लेखिंड दरम्यान तासनतास खोळंबा होत आहे.
