खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान दिल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. कालपासून मातोश्रीसमोर शेकडो शिवसैनिक गोळा झाल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे खारमध्ये राणा दांपत्याच्या घराखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक घोषणाबाजी करुन त्यांचा निषेध करत आहेत. असं असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलना भाजपाचा पाठिंबा आहे की नाही यासंदर्भात भाष्य केलंय.

नक्की वाचा >> “उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी, आंदोलन करणारे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे असते तर…”; राणा दांपत्याचा हल्लाबोल

हे सामान्य माणसाला न कळणारं
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणावर भाष्य केलं. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरामीटर बदलत आहेत. त्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था हातात घेणं हा नवा पॅरामीटर त्यांनी डेव्हलप केलाय,” असा टोला पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. “मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल, पोल खोल यात्रेच्या दगडफेकीमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पकडले गेले ते असेल किंवा आज जो ड्रामा सुरु आहे. हाय व्होल्टेज ड्रामा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर प्रचंड संख्येने शिवसैनिक गोळा झाले असून त्यांनी बॅरिकेट्स तोडले. ज्या प्रकाराने हे सगळं चाललंय हे सामान्य माणसाला न कळणारं आहे. भाजपा याचा निषेध करतेय याबद्दल चिंता व्यक्त करतेय,” असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

हुकूमशाही आलीय का?
“समजा मातोश्रीवर येणार असेल तर मातोश्रीच्या प्रमुखांनी तक्रार द्यायची असते की मला सुरक्षा पुरवा. पोलीस सुरक्षा देत असतात. सध्याची मोहित कंबोज हल्ला प्रकरण, पोलखोल यात्रेवर झालेली गडफेक आणि आता राणा प्रकरण पाहता राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. अकोल्यातील कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही टाकलं तर त्याच्या घरात घुसून शिवसैनिकांनी दम दिला. हुकूमशाही आलीय का? काय चाललंय काय मला कळत नाही,” असं पाटील म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “मुझको राणाजी माफ करना असं नवनीत राणा रवी राणांना बोलणार आहेत, कारण…”

कार्यकर्ते बोलवून कायदा सुव्यवस्था हाती का घ्यायची?
“सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, नेते सगळे जाऊन बसलेत त्या राणांच्या घरासमोर कसे बाहेर पडतात बघू अरे हे पोलिसांचं काम आहे तुमचं काम नाहीय,” असा टोला पाटील यांनी शिवसैनिकांना लगावलाय. “राणांनी म्हटलं की आम्ही तुमच्या घरासमोर येऊन हनुमान चालिसा म्हणणार आहोत. तुम्ही म्हटलं पाहिजे की समोर कशाला घराच्या आतमध्ये या. खुर्चांची व्यवस्था करा, प्रसादाची व्यवस्था करा. हनुमान चालिसा ही काय राक्षस चालिसा आहे का?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. “ज्या मारुतीला आपण शक्तीचं प्रतिक म्हणून पाहतो त्याचं मारुती स्त्रोत्र किंवा हनुमान चालिसा कोणी म्हणणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. स्वागत करायचं नसेल तर पोलिसांना सांगितलं पाहिजे. आपले कार्यकर्ते बोलवून कायदा सुव्यवस्था कशाला हातात घ्यायची,” असं पाटील म्हणालेत.

नक्की वाचा >> Rana vs Shivsena : शिवसैनिकांना वेगळीच शंका, राणांच्या घाराबाहेर गाड्यांच्या डिक्क्यांची तपासणी; ‘मातोश्री’बाहेर दुसऱ्या दिवशीही गर्दी

आपण मिळून हनुमान चालिसा म्हणू
यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारताना, राणांच्या घराच्याबाहेर सुरु असणाऱ्या राड्याबद्दल तुम्ही बोललात पण तिथे भाजपाचे कार्यकर्ते दिसत नाहीत, असं म्हटलं. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी, “मुळात नवनीत राणा आणि रवी राणा हे अपक्ष खासदार, आमदार आहेत. त्यांनी पुकारलेलं हे आंदोलन आहे. त्या आंदोलनाबद्दल कशाला टीका टीप्पणी करायची. त्याऐवजी म्हणायची की या या आपण मिळून हनुमान चालिसा म्हणू त्यामुळे राणांच्या आंदोलनामध्ये भाजपाने सहभागी होणे किंवा त्यात पडण्याची आवश्यकता नाही,” असं स्पष्ट मत मांडलं.

नक्की वाचा >> मुंबईत घडामोडींना वेग! मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याबरोबरच पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाची पोलीस सुरक्षा वाढवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमचा पाठिंबा आहे त्यांना?
या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं. “आमचा पाठिंबा त्या आंदोलनाला असण्याचा काही मुद्दाच येत नाही ना. ते त्यांनी पुकारलेलं आंदोलन आहे. आमचं म्हणणं ऐवढचं आहे की या देशात हनुमान चालीसा म्हणण्याला विरोध करणार का? ते त्यांनी त्यांच्या घरासमोर म्हणावं की कोणाच्या हा त्यांचा मुद्दा आहे. त्यात एक खासदार एक आमदार आहे. तर बोलून काही मार्ग काढता येईल. मी तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी तयारी कर आपण दोघे मिळून हनुमान चालीसा म्हणू,” अशी सामंस्याची भूमिका घेणं गरजेचं होतं असं पाटील म्हणाले.