कराड : लहान मुलांमध्ये कर्करोग बरा होण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु, जीवनशैलीतील बदल आणि अनारोग्यकारक अन्नाच्या (जंक फूड) वाढत्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत पालक आणि मुलांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.

लायन्स क्लब कराड शाखेतर्फे ‘लहान मुलांमधील कर्करोग जनजागृती’ अभियानानिमित्त कृष्णा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लायन्स इंटरनॅशनलकडून दर वर्षी १३ सप्टेंबर हा दिवस ‘लहान मुलांमधील कर्करोग जनजागृती अभियान दिन’ म्हणून पाळला जातो. सप्टेंबर महिनाभर हे अभियान सुरू राहते. या निमिताने लायन्स क्लब कराड शाखेतर्फे हा विशेष कार्यक्रम आयोजिला होता.

कृष्णा रुग्णालयाने कर्करोग उपचारात दिलेल्या उत्तुंग योगदानाची दखल घेत, लायन्स क्लबच्या वतीने डॉ. सुरेश भोसले यांचा सन्मानपत्रासह यथोचित गौरविण्यात आला. कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय व्यवस्थापक डॉ. आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर, डॉ. प्रणीता पाटील आदींचाही या वेळी लायन्स क्लब कराड शाखेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार केला.

कार्यक्रमास लायन्स क्लब कराड शाखेचे अध्यक्ष सतीश मोरे, क्लबचे सचिव सुप्रीम तावरे, खजिनदार दशरथ वाघमोडे, योगेश देशमुख, नईम कागदी, प्रवीण राव, विजय खबाले, अनिल पवार, राहुल कुंभार, सुहास जगताप आदी लायन्स क्लब कराड शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘कृष्णा’ योजना अंमलबजावणीत अग्रस्थानी

कृष्णा रुग्णालयात राज्य व केंद्र शासनाच्या आरोग्यविषयक सर्व योजना राबवून त्या माध्यमातून कर्करोगावर मोफत उपचार केले जातात. महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मंजूर केलेल्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जातात. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत कृष्णा रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि ही अभिमानाची बाब असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.