शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहीम सुरु आहे. मुंबई तसंच ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसंच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु- संजय राऊत
“काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांची प्रतिक्रिया-
“ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल”.