नगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यात वाद असल्याची कबुली देतानाच हे वाद म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळ आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या एका बाजूला मंत्री विखे व दुसऱ्या बाजूला माजी मंत्री शिंदे बसले होते. या दोघांतील वादाबाबत फडणवीस यांना विचारले असता त्यांनी, म्हणूनच मी दोघांमध्ये बसलोय, समन्वय झाला आहे, असे ते म्हणाले.

नंतर झालेल्या भाजप मेळाव्यात बोलताना आमदार राम शिंदे यांनी पुन्हा पेल्यातील वादाचा मुद्दा छेडला. वाद संपला, असे आपण सांगितले असले तरी पेल्यातील वाद पेल्यातच राहिला पाहिजे, तुमच्यासमोर जास्त बोलायची हिंमत आम्ही करू शकत नाही. मात्र, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे, त्यावर बोलावे, अशी विनंती त्यांनी फडणवीस यांना केली.

राधाकृष्ण विखे यांनीही मेळाव्यात बोलताना आमदार शिंदे यांच्या वक्तव्याचा धागा पकडत, पक्षाच्या शिस्तीबाहेर आम्ही कुणीच नाही, असे स्पष्ट केले. आपण एकाच घरात आहोत. आजही जबाबदारी माझ्यावरच आहे आणि उद्याही माझ्यावरच असणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, असे सूचक विधानही विखे यांनी केले. फडणवीस यांचे मार्गदर्शन आपल्या पाठीशी आहे. जी जबाबदारी आमच्यावर दिली जाईल, जे आदेश देतील ते शिरसावंद्य मानून काम करू, असेही विखे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोटय़ा गोष्टींवर वाद घालू नका!

विखे-शिंदे वादासंदर्भात मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, त्यामुळे आता छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर नाराज होऊ नका, कुठलेही वाद करू नका, मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे, एवढेच ध्येय व उद्देश समोर ठेवून काम करा.