अहिल्यानगर : करोना संसर्ग झालेला नसतानाही तो झाल्याचा बनाव करत वयोवृद्ध रुग्णास करोनाबाधित रुग्णांसोबत मर्जीविरूद्ध दाखल केले. त्यांच्यावर अति तीव्र स्वरुपाचे, जीवितास धोका निर्माण होईल असे औषधोपचार करून मृत्यूस कारणीभूत झाल्याचा तसेच औषधोपचाराची अवाजवी देयके आकारून फसवणूक केली, अवयवांची तस्करी केली व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून शहरातील विविध रुग्णालयांच्या ६ डॉक्टरांविरूद्ध तोफखाना पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या सहाही डॉक्टरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सहा जणांमध्ये दोघे खासगी रुग्णालय चालवणारे, दोघे कोविड सेंटर चालवणारे, एक जण पॅथॉलॉजिस्ट तर आणखी एक जण एका प्रतिष्ठानच्या रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. याशिवाय इतर कर्मचार्‍यांविरूद्धही कट करत तालुका फसवणूक व मृत्यूस कारणीभूत झाल्याचा आरोप आहे.

यासंदर्भात अशोक बबनराव खोकराळे (वय ४७, रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनीच उच्च न्यायालयात या घटनेसंदर्भात दाद मागितली होती. त्यांचे ७९ वर्षीय वडील बबनराव नारायणराव खोकराळे यांचा या घटनेत मृत्यू झाला. ऑगस्ट २०२० दरम्यानची घटना आहे.

संशयित आरोपी डॉक्टरांनी सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावरील पटियाला हाऊस येथे तात्पुरते करोना उपचार केंद्र सुरू केले होते. वडिलांना घशाची खवखव व बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता. त्याच्या उपचारासाठी संबंधित डॉक्टरांनी त्यांना पटियाला हाऊस येतील कोविड सेंटरमध्ये दाखल केले.

करोना निदान तपासणी अहवाल साधारण असूनही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले तसेच फिर्यादी यांना न कळवताच परस्पर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. खासगी रुग्णालयातून वडिलांनी मुलांना फोन करून ‘डॉक्टर मला बेडला बांधून ठेवतात, खूप रक्त काढले, मला इथून घेऊन जा,’ अशी विनवणी केली होती.

अशोक खोकराळे यांनी भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडवण्यात आले व डॉक्टरांनी ‘रुग्ण नॉर्मल आहे’ असे सांगितले. मात्र नंतर ते करोनाबाधित असल्याचे सांगून डिस्चार्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२० रोजी अशोक खोखराळे यांना वडीलांच्या मृत्यूची बातमी मिळाली. रुग्णालयाने १ लाख ८४ हजार रुपयांचे देयक भरण्यास सांगीतले.

देयक अदा केल्यानंतर मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवल्याचे सांगीतले. मात्र अशोक खोकराळे यांनी शोधाशोध करूनही वडीलांचा मृतदेह आजपर्यंत सापडला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.