सातारा : साताऱ्यातील कण्हेरी (ता. खंडाळा) येथे सीताफळाच्या बागेला लागलेली आग विझवताना गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा कल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. आगीत जखमी होण्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली होती. संपत पाटणे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते कण्हेरी गावाचे (ता. खंडाळा) माजी सरपंच आहेत. वणव्यामुळे लागलेली आग विझवताना शेतकऱ्याच्या मृत्यूची जिल्ह्यातील सलग दुसरी घटना आहे. पाटण तालुक्यातही आंब्याच्या बागेला वणव्यामुळे लागलेली आग विझवताना तुकाराम सीताराम सावंत या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे डोंगर माळाला लागणारे वणवे आणि त्यातून होणारे नुकसान पुन्हा एकदा पुढे आले आहे.

कण्हेरी गावात डोंगरालगत संपत पाटणे यांची सीताफळाची बाग आहे. या बागे शेजारील भागास शुक्रवारी दुपारी अज्ञाताने वणवा लावला. ही घटना समजताच संपत पाटणे हे त्यांच्या बागेचे नुकसान होऊ नये म्हणून धावले. दुष्काळग्रस्त कण्हेरीत मोठ्या कष्टाने वाढवलेली झाडे जळून जाऊ नये, यासाठी त्यांनी आगीत शिरून ती विझविण्याच्या प्रयत्न केला. या दरम्यान ते या आगीत सापडले. त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तिथे कुणीही नसल्याने त्याच्या मदतीला कुणीही येऊ शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळानंतर शेजारील शेतातील शेतकरी महिलेला ही घटना दिसली. महिलेने तातडीने फोनवरून ही घटना पाटणे यांच्या घरच्यांना दिली. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत ते जवळपास ८० टक्के भाजले होते.अंगावरचे कपडे जळून खाक झाले होते. पुणे येथील ससून रुग्णालयात गंभीररीत्या भाजलेल्या पाटणे यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कण्हेरी गावावर शोककळा पसरली आहे.कण्हेरीचे सरपंच म्हणून संपत पाटणे यांचा कारभार उल्लेखनीय ठरला होता. तसेच पुणे येथील बाजार समितीमध्ये सीताफळाचे प्रसिद्ध बागायतदार म्हणून त्यांची ओळख होती.