मुंबई : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी ते मे, या तीन महिन्यांत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीच्या वितरणास मंजुरी दिली आहे.

राज्याच्या बहुतांश भागाला फेब्रुवारी ते मे, या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसला होता. शेतीतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. विभागनिहाय नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागात ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांची ३४ हजार ५४२.४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होती, त्यापोटी ५९ कोटी ९८ लाख २० हजार रुपये. पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांची ४५ हजार १२८.८८ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती, त्यापोटी ८१ कोटी २७ लाख २७ हजार रुपये. नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांची ४५ हजार ९३५.१६ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती, त्यासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार रुपये. कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपये.

अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मंजूर झाले आहेत. एकूण ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. हा मदत तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

फेब्रुवारी ते मे, या तीन महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत न मिळाल्या बद्दल आणि दीड महिन्यानंतरही नुकसानीचे पंचनामे अंतिम न झाल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी पंचनामे अंतिम टप्प्यात असून, तातडीने नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांना तातडीने मदत

राज्यातील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिली.