लोकसत्ता वार्ताहर

वाई : आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण-तरुणींना सामाजिक बहिष्कारापासून जीवघेण्या हल्ल्यापर्यंतच्या घटनांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर अशा दाम्पत्यांना सुरुवातीचा काही काळ सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे सातारा जिल्ह्यात राज्यातील पहिले ‘सुरक्षित आश्रयस्थळ’ उभारण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र अंनिस’ गेली अनेक वर्षे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. कुटुंबीयांच्या टोकाच्या विरोधामुळे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना सुरुवातीच्या काळात धमक्या, सामाजिक बहिष्कार ते जीवघेण्या हल्ल्यापर्यंतच्या संकटांना तोंड द्यावे लागते. सुरुवातीला त्यांना आपल्या गावात, घरी राहणेही अवघड होते. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित निवाऱ्याची गरज असते. पंजाब, हरियाणासारख्या राज्यांमध्ये (जेथे खोट्या प्रतिष्ठेमधून तरुणाचा बळी दिला जातो) राज्य सरकारच्या साहाय्याने अशी आश्रयस्थळे चालवली जातात. तशाच स्वरूपाचे हे पहिले आश्रयस्थळ सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> प्रगतीच्या वाटेवरील अग्रेसर जिल्ह्यांचा आज सन्मान

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या गृह विभागाने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीकडे मदत मागणाऱ्या दाम्पत्यांना संरक्षण पुरवण्यात यावे, तसेच प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासाठी सुरक्षित निवारा केंद्र उभारावे, असे आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे ‘महाराष्ट्र अंनिस’सारख्या ‘सुरक्षित निवारा केंद्र’ चालवणाऱ्या संस्थेला बळ मिळेल, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र अंनिस’ मार्फत चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमास आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेली काही दाम्पत्ये मदत करणार आहेत. याशिवाय, अशा दाम्पत्यांच्या मदतीसाठी ‘अंनिस’मार्फत एक आधार गटही सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> सांगली : मिरजेत परिचारिका महाविद्यालय सुरु करण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी

दाम्पत्यांना आधार

घरच्यांचा विरोध धुडकावून आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अनेक दाम्पत्ये सुरुवातीला असुरक्षित स्थितीत असतात. त्यांना सुरक्षित आश्रयस्थळाची गरज असते. म्हणूनच ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने ‘सुरक्षित आश्रयस्थळ’ उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. हमीद दाभोलकर आणि शंकर कणसे यांनी दिली. शंकर कणसे यांनी स्वत:च्या खर्चाने हे ‘सुरक्षित आश्रयस्थळ’ बांधले आहे. ‘महाराष्ट्र अंनिस’ आणि ‘स्नेह आधार’ या संस्थांमार्फत हा उपक्रम चालवला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे राज्यातील हे पहिले ‘आश्रयस्थळ’ उभारण्यात आले आहे. ते नि:शुल्क आहे. आंतरजातीय-धर्मीय दाम्पत्यांसाठी ९९२२३५५४३५ ही मोफत हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.