लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : पुणे बंगळूर महामार्गावर खिंडवाडी (ता. सातारा) येथे रात्री फिरत असताना वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण यांच्यासह पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुणे बंगळूर महामार्गावर खिंडवाडी (ता सातारा) येथे रात्री फिरत असताना वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता. त्याला पकडून उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार होते. यासाठी बिबट्याला पकडण्यास गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण यांच्यासह वनरक्षक सुहास काकडे, महेश अडागळे, सचिन कांबळे, मयूर अडागळे जखमी झाले आहेत. खिंडवाडी (ता सातारा) येथील उंटाच्या डोंगर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सातारा तालुका वनविभागाचे पथक गेले होते.

आणखी वाचा-राज्यातील पारंपरिक विणकरांना मदतीचा हात! राज्य शासनाच्या वतीने दिला जाणार ‘उत्सव भत्ता’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उंटाचा डोंगर परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. दुपार चार नंतर हे पथक उंटाचा डोंगर परिसरात दाखल झाले. जखमी असल्याने वनविभागाच्या वतीने टाकण्यात आलेल्या जाळीमध्ये बिबट्या सापडला नाही. याववेळी चवताळलेल्या बिबट्याने चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या झटापटीमध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच इतरही कर्मचारी जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर आर एम रामानुजन यांनी साताऱ्यातील रुग्णालयात सर्व जखमी ची भेट घेऊन विचारपूस केली. साताऱ्याचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी या घटनेची माहिती दिली