राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधला आहे. फ्लेचर पटेल कोण आहेत? अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी ट्वीटरला फ्लेचर पटेल यांचे एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. याच फ्लेचर पटेल यांनी आता आपल्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबद्दल पटेल म्हणाले, आज जर आम्ही एनसीबीचे योद्धा झालो आहोत तर नवाब मलिकांना काय मिरच्या झोंबल्या आहेत हे प्रवीण दरेकर आणि फडणवीसांनी सांगितलंच आहे. तेव्हा मी मलिकांना विनंती करतो की विनाकारण कोणत्याही सैनिकाचं नाव घेऊ नका. माझा नंबर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे तुमचे कार्यकर्ते आहेतच. तुम्ही मला बोलावूही शकता, तुम्ही मोठे मंत्री आहात. पण कोणत्याही सैनिकाला किंवा गणवेशधारी अधिकाऱ्याला त्यांची कामाप्रती सचोटी दाखवण्यासाठी आपल्या परवानगीची गरज नाही. तुम्ही जर खरंच ड्रग्जच्या विरोधात आहात तर समोर या आणि आमच्या मोहिमेला पाठिंबा द्या. आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करा. मी तुमच्याच भागात तुम्हाला दाखवतो की कुठे कुठे काय काय सापडतंय.

हेही वाचा – फ्लेचर पटेल कोण आहे? समीर वानखेडेंचा त्यांच्याशी काय संबंध?; नवाब मलिकांच्या नव्या आरोपामुळे खळबळ

“मनिष भानुशाली याने मी खबरी असल्याचं सांगितलं. गोसावी हा फरार आरोपी आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत २ ऑक्टोबरच्या आधी आपण त्यांना ओळखत नव्हतो अशी माहिती दिली आहे. स्वतंत्र पंच असल्याचं एनसीबीने सांगितलं असून मी त्याबाबतीत आज प्रश्न उपस्थित करत आहे. आता एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. फ्लेचर पटेल यांच्या प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असा आरोपही त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे.