परभणी: जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असून आज शनिवारी दिनांक 27 सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. अद्यापही शिवारातले पाणी कमी होताना दिसत नाही तोच नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात गंगाखेड- पालम या रस्त्यावरील वाहतूक पुरामुळे बंद झाली असून चुडावा येथे पुराचे पाणी असल्याने नांदेडकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणची अंतर्गत वाहतूक ठप्प झाली आहे.

गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड पालम तसेच गंगाखेड राणीसावरगाव रस्ता बंद झालेला असून गंगाखेड, पूर्णा, पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. पोलीस ठाणे चुडावा हद्दीत पूर्णा ते नांदेड रोडवर चुडावा गावाजवळ पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद केलेली आहे. योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. चुडावा येथे पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. नगरपालिका महसूल व पोलीस पथक पूर्णा तालुक्यातील सदर व्यक्तीला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

नाव्हा पालम तालुक्यातील नाव्हा व पालम शहरातील काही व्यक्तींना घरात पाणी गेल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले असून तालुक्यातील शेख राजुर येथे पुराच्या पाण्यामध्ये दोन व्यक्ती अडकलेल्या आहेत. या व्यक्तींना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चुडावा येथे पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर सुखरूप काढण्यात आले असून शेख राजुर येथे शेतात अडकलेल्या दोन व्यक्तींना पुरातून सुखरूप बाहेर काढून नदीच्या पलीकडील भागात सुरक्षित अंतरावर ठेवले आहे. पालम तालुक्यातील गुळखंड जवळा येथे पुराचे पाणी गावात आले आहे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

आज सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात १९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. परभणी तालुक्यातील दैठणा, पिंगळी, परभणी ग्रामीण, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड ग्रामीण,महातपुरी, राणीसावरगाव, पिंपळदरी, माखणी, पूर्णा तालुक्यातील पूर्णा, ताडकळस, लिमला, कातनेश्वर, चुडावा, कावलगाव, पालम तालुक्यातील पालम, चाटोरी, बनवस, पेठशिवणी, राजुर, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, वडगाव या मंडळांचा त्यात समावेश आहे. आज जिल्ह्यात सर्व दूर पाऊस असून अनेक ठिकाणचे अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत.