सातारा जिल्ह्यातील पडळ (ता. खटाव) येथील खटाव – माण अॅग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना आज(मंगळवार) वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत.
जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलीसात एकूण २० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना वडूज पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांच्या विरुध्द अटक वॉरंट न्यायालयाने काढले होते. त्यानंतर सातारा येथे वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर वडूज पोलीसांनी त्यांना सातारा येथून ताब्यात घेतले.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने शनिवार दि. १५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.
साखर कारखान्यातील साखर परस्पर कारखाना व्यवस्थापनाच्या अपरोक्षपणे विकत असल्याचा जगदीप थोरातांवर आरोप ठेवत, प्रभाकर घार्गे व इतरांनी त्यांना मारहाण केली होती. या मारहाणीनंतर जगदपी थोरात यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.