सोलापूर : सोलापुरातील ११८ वर्षांच्या जुन्या शेठ सखाराम नेमचंद औषधालय ट्रस्टमध्ये १६ वर्षांपूर्वी झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटनेप्रकरणी संस्थेचे तत्कालीन सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापुरात नामवंत मानल्या जाणाऱ्या या जुन्या संस्थेतील वाद अलिकडे काही वर्षांत वाढले आहेत. यात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याची भर पडली आहे. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योगपती अरविंद रावजी दोशी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेच्या तत्कालीन सचिवासह संस्था संचलित शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यातील तत्कालीन सचिव आणि प्राचार्यांनी मिळून संस्थेने कोणताही ठराव संमत केलेला नसताना बनावट आणि आणि खोटा ठराव करून दि रत्नाकर बँकेत तो खरा असल्याचे भासवून मुदतपूर्व ठेवी मोडल्या. त्यातील तीन लाख ९२ हजार ९३५ रूपये काढून घेतले. हा प्रकार २००५ ते २००९ या कालावधीत घडला. तसेच संस्थेला कर्जाची गरज नसताना संस्थेच्या इतर विश्वस्तांना माहिती न देता बँकेतील २४ लाख रुपयांच्या ठेवीवर आठ लाख रुपयांचे तारण कर्ज काढले. यात दोघांनीही अधिकारपदाचा गैरवापर करून ११ लाख ९२ हजार ९३५ रुपये वापरून संस्थेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोलापूरचे ज्येष्ठ उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद दोशी यांच्याशी संबंधित शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद औषधालय संस्थेची स्थापना १९०७ साली झाली असून त्यानंतर पुढे १९६२ साली संस्थेने शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना केली होती. या आयुर्वेद महाविद्यालयासह आयुर्वेद औषधालय दोन्ही संस्था प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या समजल्या जातात.