गडचिरोलीत काल (शनिवार)पासून सर्व व्यवहार, व्यापार व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू झाली आहेत. सर्व व्यवहार सुरू होणारा ग्रीन-झोनमधील गडचिरोली हा पहिला जिल्हा ठरला आहे. तर सोमवारपासून चंद्रपूर जिल्हयात लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करून दुकाने सकाळी 10 ते 2 सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंघला यांनी येथे सर्व व्यवहार सुरू केले. व्यवसाय व दुकानाना सकाळी 7 ते सायंकाळी 5 सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच बस सेवा 50 टक्के सुरू राहणार आहे. मात्र शाळा, महाविद्यालयात, कोचिंग, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत.

नागरिकांनी घरातच रहावे असे आवाहन चंद्रपुरचे जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केले आहे. आवश्यक सेवांची दुकाने 7 ते 2, अन्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2, रविवारी फक्त जीवनावश्यक दुकाने सुरू, दुचाकीवर केवळ एका नागरिकाला मुभा, रिक्षामध्ये मागच्या सीटवर फक्त दोन व्यक्ती,चार चाकी गाडी ड्रायव्हर आणि मागे दोन व्यक्ती, जिल्हा अंतर्गत आता पासची गरज नाही, जिल्हा बाहेर प्रवास करता येणार नाही, बाहेरून येणारा व्यक्ती 14 दिवस क्वारंटाइन होईल, जिल्ह्यात 144 कलम यापुढेही कायम आहे. सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तीं पुरतीच संख्या मर्यादित राहील तसेच लग्नसमारंभाला संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीने 50 व्यक्तीं पर्यंत परवानगी देण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेणे बंधनकारक राहील असे न केल्यास कार्यवाहीस पात्र राहील. जिल्ह्याच्या सीमा आजही बंद आहेत. आंतरराज्य व जिल्हा मनुष्य वाहतूकीस बंदी आहे.