परभणी : जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने अक्षरशः कहर केला असून गोदावरी, दुधना यासह महत्त्वाच्या नद्या जोरदार वाहू लागल्या आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोदाकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. श्री. क्षैञ गुंज ( ता.पाथरी ) या गावास गोदावरी नदीच्या पाण्याने पूर्णपणे वेढा घातला आहे. येथील दत्त मंदिराच्या पायरीपर्यंत आज (दि.२३) पहाटे गोदावरीचे पाणी पोहोचले आहे.या ठिकाणचे उद्यान पूर्णपुणे पाण्याखाली गेले आहे. वरचेवर पुराचे पाणी वाढतच आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्याने खरीप हंगाम पूर्णपणे काळवंडला आहे.

आज गोदावरी नदीपात्रात जायकवाडी आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. तसेच बीड मधील वाण नदी आणि परभणीतील इंद्रायणी नदीतूनही गोदावरीला पाणी येत असल्याने गोदावरी, इंद्रायणी, पूर्णा नदीकाठी असलेल्या सर्व गावांना सतर्क करण्याची व गरजेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सर्व यंत्रणानी प्राधान्याने करावी अशा सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. निम्न दुधना, येलदरी या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.येलदरी जलाशयातून पूर्णा नदीच्या पात्रात आज मंगळवारी (दि.२३) चार दरवाज्यातून एक मिटरने तर सहा दरवाज्यातून अर्धा मिटरने उचलून अशा एकूण दहा दरवाज्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निम्न दुधना धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील पावसाने आता वार्षिक सरासरी ओलांडली आहे. येलदरी धरण १०० टक्के भरले असून, सिद्धेश्वर धरण ९६.५७ टक्के तर, निम्न दुधना धरण ७५.५ टक्के भरले आहे. सध्या गोदावरी नदीला पूर आला असून पाथरी मानवत सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा या तालुक्यांमध्ये गोदाकाठच्या गावांमध्ये पुराची परिस्थिती उद्भवली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात असलेले ढालेगाव तारू गव्हाण मुदगल मुळी या ठिकाणचे उच्च पातळी बंधारे शंभर टक्के भरले आहेत. गोदावरी नदीवरील ढालेगाव, गंगाखेड या ठिकाणच्या प्रवाहाने धोक्याची पातळी गाठली आहे. गोदाकाठच्या गावांमध्ये रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुलाचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात विशेषतः पाथरी उपविभागात पुराची स्थिती उद्भवली असून छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय सैन्य दलाची तुकडी प्राचारण करण्यात आली आहे या तुकडीचे नेतृत्व मेजर कमाल हे करत आहेत. ही तुकडी लवकरात लवकर दाखल होईल असे प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान अजूनही जिल्ह्यात हजारो हेक्टरवर शेतात पाणी असून उंचवट्यावरील जमिनी वगळता बहुतांश जमिनीवर असलेल्या कापूस, सोयाबीन या पिकांची आशा आता शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. अतिवृष्टीचा फटका भाजीपाला पिकांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.