कर्नाटकात काँग्रेसने सत्तास्थापन केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी नुकतीच पदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून रंगत आहे. त्यामुळे समविचारी असलेले बरेच नेते आज शपथविधीसाठी कर्नाटकात दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकातील नव्या सरकारचे अभिनंदन केले आहे. तसंच एक महत्त्वाची विनंतीही केली आहे. आदित्य ठाकरे मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला आज गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“कर्नाटकात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आम्ही शुभेच्छा देतो. पण तेथील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नये. या बांधवांकडे लक्ष द्या असं आम्ही नवीन सरकारला सांगत आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> २ हजाराच्या नोटा वितरणातून काढण्यावर आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “आरबीआयकडून…”

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकात २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्याचा मार्ग एकदम मोकळा झाला. मुख्यमंत्री पदाचा पेचही संपुष्टात आला असून आज शपथविधी सोहळाही पार पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी हे आवाहन केलं आहे.

नोटबंदीवर काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत, याकडे तुम्ही कशादृष्टीने पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत आरबीआयने सतत पुढे मागे पुढे मागे केलं आहे. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई महापालिका, महापौर आणि इतर मुद्द्यांवरून हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे , नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. “आमचे सरकार असताना कोणतेही वाद झाले नाही, जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारी साठी हे वाद आणि दंगली होत आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.