अलिबाग : शिधावाटप केंद्रांवर ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिनसांबरोबर साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. रायगड जिल्ह्यात ८४ हजार साडया वितरणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साडयांचे वितरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना शिधावाटप केंद्रांवरील साडयांसाठी किमान चार महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.

राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ देताना साडी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी मार्चच्या पहिल्या आठवडयापासून राज्यातील विविध शिधावाटप केंद्रांतून होणार होती. अंत्योदय घटकांत मोडणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी ८४ हजार साडया उपलब्ध झाल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवडयापासून वितरण सुरू करण्यात आले असले तरी काही ठिकाणी साडया विलंबाने पोहोचल्याने साडी वितरण प्रक्रिया उशिराने सुरू झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि साडयांच्या वितरणावर गदा आली.

रायगड जिल्ह्यातील ४० हजार साडयांचे वितरण करण्यात आले असून ४४ हजार साडयांचे वितरण शिल्लक आहे. पण निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता साडयांचे शिधावाटप केंद्रांवरील वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता ६ जूननंतर आचारसंहिता शिथिल झाल्यानंतरच साडी वितरणाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

हेही वाचा >>> सिंधुदुर्ग-कोल्हापूर डोंगररांगांत २२ पट्टेरी वाघ

शिधावाटप दुकानांमधून ‘मोदी सरकारची हमी’ असा उल्लेख असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वितरणही थांबवण्यात आले आहे. दहा किलो क्षमतेच्या या पिशव्यांचे वितरण केल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी ४ लाख ५६ हजार पिश्व्या वितरणासाठी प्राप्त झाल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातही बंद

उत्तर महाराष्ट्रात ७० ते ७५ टक्के साडीवाटप पूर्ण झाले असून आचारसंहितेमुळे अन्य साडयांचे वितरण थांबले आहे. नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईपर्यंत ७५ टक्के साडयांचे वितरण झाल्याचे पुरवठा विभागाने म्हटले आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख ७६,५५२ साडया प्राप्त झाल्या होत्या. त्यातील एक लाख ३४,४६९ साडयांचे वाटप झाले आहे. धुळे जिल्ह्यात ५९,३५२ साडयांचे वाटप झाले. आचारसंहिता लागू झाल्याने १६,३८६ साडयांचे वाटप बाकी आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सोमवारपासून शिधावाटप केंद्रांवरील पिशव्या आणि साडया यांचे वितरण थांबविण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व शिधावाटप केंद्रांना देण्यात आले आहेत. – सर्जेराव सोनवणे,  जिल्हा पुरवठा अधिकारी